एक किलो टोमॅटोसाठी 300 रुपये मोजायला तयार व्हा? किचनमधलं बजेट आणखी बिघडणार

Tomato Price Hike: टोमॅटोच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. टोमॅटोचे दर 300 रुपये गाठणार असल्याची चर्चा निर्माण होत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 3, 2023, 07:48 PM IST
एक किलो टोमॅटोसाठी 300 रुपये मोजायला तयार व्हा? किचनमधलं बजेट आणखी बिघडणार title=
Tomatoes get costlier again price shoot up to Rs 300 a kilo

Tomato Price Update: सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असेलेल्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या महिन्याभरापासून टोमॅटोच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. सुरुवातीला २५ ते ३० रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो आता ३०० रुपये किलोने विकला जाण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांकडून असा दावा केला जात आहे. 

अवकाळी पावसामुळं आणि मान्सूनमुळं टोमॅटोच्या दराने उसळी घेतली होती. आवक घटल्याने किरकोळ बाजारात दर वाढले होते. मात्र एक महिन्यानंतरही टोमॅटोच्या दरात घसरण होण्याची किंचितही शक्यता नसल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

दिल्लीतील आझमपूर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून टोमॅटोची आवक कमी होत आहे. मुसळधार पावसामुळं पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचे दर प्रतिकिलो 160  रुपयांपर्यंत 220 रुपयांपर्यंत वाढले असून त्यामुळं किरकोळ दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. टोमॅटो, शिमला मिरची व इतर हंगामी भाज्यांची विक्री मोठ्या प्रमाणात घटल्याने भाजीपाला घाऊक व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

टोमॅटोच्या प्रमुख उत्पादक क्षेत्रांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं टोमॅटोच्या किंमतीत गेल्या एक महिन्यांपासून किंमती वाढली आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलन आणि मुसळधार पाऊस यामुळं दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. उत्पादकांना भाज्या तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी सहा ते आठ तास लागतात. अशी स्थिती असल्यामुळंच टोमॅटोचे भाव 300 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचू शकतात. 

टोमॅटोसह अन्य भाज्या हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून येतात.हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या टोमॅटो आणि इतर भाज्यांचा दर्जाही खालावल्याचे म्हटले जात आहे. सामान्य दिवशी टोमॅटो बरेच दिवस खराब होत नाहीत. मात्र यावेळी टोमॅटो एका दिवसानंतर क्रेटमध्येच सडू लागतात. म्हणूनच ते जास्त काळ ठेवता येत नाही , हे देखील एक कारण आहे. 

 उत्तराखंड, हिमाचल प्रदेशातील घाऊक मंडईत टोमॅटोचे भाव वाढत आहेत, तर तामिळनाडूमध्येही टोमॅटोचे भाव वाढत आहेत. टोमॅटोचे घाऊक भाव इथेही २०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. चेन्नईतील कोयंबेडू घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव कमी होण्याऐवजी वाढत आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी टोमॅटोच्या दरात होणारी वाढ दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे.