Tomato Theft: टॉमेटोच्या किंमतींनी शंभरी पार केली आहे. त्यामुळे आता टॉमेटोला देखील 'सोन्याचा भाव' चढला आहे. सोने चांदी,पैसे चोरणाऱ्या चोरांची नजर आता टॉमेटोवर पडली आहे. कर्ज घेऊन शेती करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. कर्नाटकात एका महिलेच्या शेतातल्या अडीच लाख रुपये किमतीच्या टोमॅटोवर चोरांनी डल्ला मारला आहे.
कर्नाटकातील हसन जिल्ह्याच्या गोनी सोमनहल्ली गावात ही घटना घडली. बुधवारी सकाळी या शेतकरी महिला शेतातून टॉमेटो काढणारच होत्या. त्याआधीच मंगळवारी रात्री चोरट्यांनी डाव साधला. टोमॅटोच्या 50 ते 60 पोती घेऊन चोर फरार झाल्याचा आरोप आहे.महिला शेतकरी धारिणी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हाळेबिडू पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारिणी यांच्या गावात टोमॅटोचे भाव 120 रुपये प्रति किलो आहेत.धारिणी या टॉमेटोच्या पीकाची कापणी करून बेंगळुरूच्या बाजारपेठेत पाठवण्याच्या तयारीत होत्या. पण आदल्या दिवशीच चोरीची ही घटना घडल्याचे धारिणी यांनी सांगितले. चोरट्याने टोमॅटोच्या 50-60 पोती चोरून उभ्या पिकाची नासधूस केल्याचेही धारिणी यांनी पोलिसांना सांगितले. हे सांगत असताना धारिणी यांना अश्रू अनावर होत होते. ज्या पिकासाठी त्या परिवारासह रात्रंदिवस शेतात राबल्या होत्यात, ज्या शेतात घाम गाळला होता, ते टॉमेटोचं शेतच चोरांनी फस्त केलं होतं.
Karnataka | Farmer alleges tomatoes worth Rs 2.5 lakhs were stolen from her farm in the Hassan district on the night of July 4.
A woman farmer, Dharani who grew tomatoes on 2 acres of land said that they were planning to cut the crop and transport it to market as the price… pic.twitter.com/fTxcZIlcTr
— ANI (@ANI) July 6, 2023
आम्हाला आधी काढलेल्या पिकात मोठे नुकसान झाले, त्यामुळे आम्ही टॉमेटोचे पिक काढण्यासाठी कर्ज घेतले होते. शेतात आम्ही मेहनत घेतली. टॉमेटोचे चांगले पीक देखील आले होते आणि योगायोगाने बाजारात भाव देखील जास्त मिळत होता. पण टोमॅटोच्या 50-60 पोती घेऊनही चोर पसार झाले. एवढंच नव्हे तर चोरांनी शेताचे नुकसानही केले अशी माहिती धारिणी यांनी दिली.
महिलेच्या मुलाने राज्य सरकारकडे नुकसान भरपाई आणि तपासाची मागणी केली आहे. याबाबत हळेबिडू पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. आमच्या पोलिस ठाण्यात टोमॅटो लुटीची ही पहिलीच घटना आहे. धारिणीने तिच्या कुटुंबीयांसह तिच्या दोन एकर शेतात टोमॅटोचे पीक घेतले होते, जे चोरीला गेल्याचे तिने म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.
इतर राज्यांप्रमाणे कर्नाटकातही अलीकडच्या काळात टोमॅटोचे भाव झपाट्याने वाढले आहेत. बंगळुरूमध्ये टोमॅटोचे भाव 101 ते 121 प्रतिकिलो आहेत. मार्च आणि एप्रिलमध्ये तापमानात अचानक झालेल्या वाढीमुळे टोमॅटो पिकांना किड लागली. त्यामुळे टॉमेटोच्या उत्पादनात घट होऊन बाजारात भाव वाढले आहेत.