विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या ट्रांसजेंडर अनन्या कुमारी यांची आत्महत्या

केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

Updated: Jul 21, 2021, 11:28 AM IST
विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या ट्रांसजेंडर अनन्या कुमारी यांची आत्महत्या title=

मुंबई : केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. केरळ विधानसभा निवडणूकीतील पहिली तृतीपंथी उमेदवार राहिलेली आणि राज्यातील पहिली ट्रान्स रेडियो जॉकी अनन्या कुमारी यांचा मृत्यू झाला आहे. अनन्या त्यांच्या राहत्या घरी मृत अवस्थेत सापडल्या आहेत. 

कोचीमध्ये अनन्या यांचं घर आहे. याच घरी त्यांचा मृतदेह छताला लटकलेला मिळाला. अनन्या यांना सेक्स रिअसाइनमेंट सर्जरीच्या नंतर आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवल्या होत्या.

अनन्या यांनी 2020मध्ये कोचीतील एका रूग्णालयात वजिनोप्लास्टी (vaginoplasty) सर्जरी केली होती. यानंतर त्यांनी सांगितलंही होतं की, यानंतर वर्षभर त्यांना त्रास जाणवत होता. त्यांना योग्य पद्धतीने उभंही राहता येत नव्हतं. शारीरिक अडचणींमुळे त्या कामही करू शकत नव्हत्या. 

अनन्या यांनी सांगितलं होतं की, सर्जरी दरम्यान झालेल्या चुकीमुळे त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्या होत्या. या गोष्टीचा खुलासा केल्यानंतर त्या मृत अवस्थेत आढळल्या आहेत. अनन्या यांचा मृतदेह एर्नाकुलम जनरल रूग्णालयात हलवण्यात आला आहे. दरम्यान अनन्या यांना काही महिन्यांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं

असं म्हटलं जातंय की, शारीरिक त्रासामुळे अनन्या यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांनी या घटनेसंदर्भात तपासणी सुरु केली आहे. अनन्या कुमारी एलेक्स कोल्लम पेरुमन मध्ये राहात होती. केरळमध्ये ट्रांसजेटर समाजातून निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या ट्रांसजेंडर होत्या. दरम्यान अनन्या यांच्या मित्रांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे.