नवी दिल्ली: लोकसभेत गुरुवारी ऐतिहासिक तिहेरी तलाकविरोधी सुधारित विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी विधेयकायच्या बाजूने २४५ आणि विरोधात ११ मते पडली. लोकसभेत हे विधेयक बहुमताने मंजूर झाल्याने सरकार सध्या स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती तितकीशा आलबेल नसल्याचे समोर आले आहे. लोकसभेत हे विधेयक पुन्हा मंजूर करून घेणे, भाजपच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. त्यासाठी पक्षाकडून गुरुवारी सर्व खासदारांना कोणत्याही परिस्थितीत संसदेत हजर राहण्याचा व्हीप जारी करण्यातआला होता. मात्र, इतक्या स्पष्ट सूचना देऊनही भाजपचे ३० खासदार यावेळी गैरहजर राहिले. त्यामुळे आता पक्षाकडून या खासदारांवर कारवाई होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
दरम्यान, लोकसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद अनुराग ठाकुर यांना याबद्दल विचारले असता त्यांनी ३० खासदार गैरहजर असल्याची बाब मान्य केली. मात्र, यापैकी काहीजणांनी तशी पूर्वकल्पना देऊन रीतसर परवानगी घेतल्याचा दावा ठाकुर यांनी केला. तर उर्वरित खासदारांना गैरहजर राहण्याचे कारण विचारले जाईल, असे ठाकुर यांनी सांगितले.
यापूर्वी तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते तेव्हाही भाजपचे अनेक खासदार गैरहजर होते. या खासदारांना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी योग्य समज दिली होती. मात्र, त्यानंतरही हा प्रकार पुन्हा घडल्याने आता अमित शहा या खासदारांवर कारवाई करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Anurag Thakur, BJP Chief Whip in Lok Sabha on reports of 30 BJP MPs absent during #TripleTalaqBill voting: I am aware, some MPs told me and took prior permission, about others we will look into the matter pic.twitter.com/4jLXgIDvMF
— ANI (@ANI) December 28, 2018
दरम्यान, तिहेरी तलाकविरोधी सुधारित विधेयकातील तुरुंगवासाच्या शिक्षेवर सर्वच विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप नोंदवला. हे विधेयक संयुक्त निवड समितीकडे सोपवण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, केंद्र सरकारने ती अमान्य केल्याने काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, अण्णाद्रमुक, राष्ट्रीय जनता दल यांनी सभात्याग केला. बिजू जनता दल आणि तेलंगण राष्ट्रीय समितीनेही विधेयकातील तरतुदींच्या पुनर्विचाराची मागणी केली.