Crime News : उत्तर प्रदेशात (UP Crime) पाच दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्यांकाडांचा पोलिसांचा अखेर खुलासा केला आहे. मुलानेच त्याच्या वडिलांची आणि आजोबांची फावड्याने हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. वादातून मुलाने वडिलांची हत्या केली होती. तर आजोबांचा नाहक बळी गेला आहे. पोलिसांनी (UP Police) हत्येसाठी वापरलेला फावडा आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
उत्तर प्रदेशातील दनकौरच्या बल्लू खेडा गावात 7 सप्टेंबर रोजी रात्री झोपेत असताना बाप लेकावर फावड्याने हल्ला करण्यात आला होता. या घटनेत रामकुमार (52) आणि विक्रमादित्य (45) यांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी या घटनेची माहिती कुटुंबियांना कळल्यावर त्यांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णलयात रामकुमार यांना मृत घोषित करण्यात आले. तर विक्रमादित्य यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी सर्वांची चौकशी केली असता त्यांना मुलाचा जबाब संशयास्पद वाटला. त्यांनी मुलाकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामकुमार हे बसमध्ये चालकाचे काम करत होते. तीन महिन्यांपूर्वीच ते निवृत्त झाले होते. त्यानंतर ते मुलगा विक्रमादित्य याच्या कुटुंबासह गावाच्या बाहेर राहत होते. रामकुमार आणि विक्रमादित्य त्यांच्या कंपाऊंडमध्ये स्थानिक कलाकार आणि युट्युबर्ससाठी एक छोटासा स्टुडिओ बांधत होते. 7 सप्टेंबर रोजी झोपेत असतानाच दोघांवर फावड्याने हल्ला करण्यात आला होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा हल्लेखोर दुसरा तिसरा कोणी नसून विक्रमादित्य यांचा मुलगा जस्मिन असल्याचे कळताच सर्वांना धक्का बसला.
या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यावर मृत विक्रमजीत राव यांचा मुलगा जस्मिनवर त्यांचा संशय बळावला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या चौकशीत जस्मिनने सांगितले की, त्याच्या वडिलांच्या वाईट सवयींमुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त होते. विक्रमजीत राव यांच्याकडून आईचा छळ होत होता. यानंतर आई मुलांना घेऊन गावात आली. मृत विक्रमजीत राव हे कुटुंबाशिवाय नोएडा येथे राहत होते. पती-पत्नीच्या वादामुळे दोघांमध्य घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी विक्रमजीत राव यांचा जस्मिन आणि तिच्या आईसोबत जमिनीच्या हिस्स्यावरुन वाद झाला होता.
"वडिलांच्याप्रति असणाऱ्या तिरस्काराने, तसेच कुटुंबाकडे त्यांच्ये लक्ष्य नसल्याने त्यांच्याविषयी मनात राग निर्माण झाला होता. यातूनच आपण हे टोकाचं पाऊल उचललं. झोपेत असताना फावड्याने वडिलांचा खून केला. या घटनेच्या वेळी शेजारीच दुसऱ्या खाटेवर झोपलेल्या आजोबांनी आपल्याला पाहू नये म्हणून त्यांच्यावरही हल्ला करुन ठार केले," अशी कबुली जस्मिनने दिली.