नवी दिल्ली : भारताच्या राजकारणामध्ये असे अनेक नेते होऊन गेले आणि आजही असे नेते सक्रिय आहेत ज्यांच्या राहणीमानातून त्यांची राजकीय धोरणं अधिक सुस्पष्ट पद्धतीनं सर्वांपर्यंत पोहोचत असतात. देशावर सत्ता असणाऱ्या भाजपमध्येही असे अनेक चेहरे आजवर पाहायला मिळाले आहेत. (UP Election Result 2022)
यातीलच एक चेहरा म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा. गोरखपूर मतदार संघातून पाच वेळा निवडणूक जिंकलेल्या योगींची राजकीय कारकिर्द ही कायमच चर्चेचा विषय ठरली आहे. (Yogi Adityanath)
कायम आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे योगी आदित्यनाथ, त्यांचा मतदार संघ देशासाठी चर्चेचा विषय. त्यांचा राजकीय विश्वात असणारा वावर पाहता हा माणून विरोधकांना घाम फोडण्यासाठी एकटा पुरेसा आहे, असं मतही अनेकांनी पुढे केलं.
इथं सर्वांना धक्का तेव्हा बसला, ज्यावेळी हिंदुत्त्वाच्या वाटेवर चालणाऱ्या आणि कट्टरतावादी म्हणूनही विरोधांकांच्या निशाण्यावर असणाऱ्या योगींच्या आसवांचा बांध फुटला.
12 मार्च 2007 ला लोकसभेमध्ये आपल्यावर राजकीय द्वेषातून निशाणा साधला जात असल्याचं म्हणत जेव्हा योगींनी काही मुद्दे सभागृहासमोर मांडण्यास सुरुवात केली तेव्हा ते ओक्साबोक्षी रडताना दिसले.
योगींना दाटून आलेला हुंदका साऱ्या देशाचं लक्ष वेधून गेला होता. कुटुंब आणि सर्वकाही त्यागून मी इथं भ्रष्टाचाराला तोंड फोडत आहे, भूकबळी जाणाऱ्यांना न्याय देण्यासाठी भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी मी पुढाकार घेतला आणि मला आज हा दिवस पाहावा लागत आहे, असं म्हणत योगी थरथरत्या स्वरात भावनाविवश होताना दिसले.
आपल्यावर झालेल्या कारवाईचा त्यांना जबर धक्का बसला होता. हे दु:ख ते सहजासहजी पचवूच शकत नव्हते. शेवटी ज्याची अपेक्षा होती तेच झालं...
का रडले योगी?
जानेवारी 2007 मध्ये गोरखपूरमध्ये एक दंगल झाली होती. याविरोधात योगींनी आंदोलन करण्याचा निर्धार केला. आंदोलनासाठी जात असतानाच त्यांना पोलिसांनी शांतता भंग करण्याच्या आरोपाखाली अटक केली.
अशा सर्वसाधारण आरोपांन्वये अटक होऊनही योगींना 11 दिवस गोरखपूर कारागृहातच दिवस काढावे लागले. याच कारणामुळे योगी आदित्यनाथ यांच्या भावनांना लोकसभेत पूर आला.
त्यावेळी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीची सत्ता असून, मुलायम सिंह यादव मुख्यमंत्री होते. दिवस लोटले, काळ बदलला आणि ढसाढसा रडणारे हेच योगी पुढे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि यादव यांची खुर्ची गेली.
आज देशाच्या राजकारणात या योगींना एक मोठं स्थान आणि त्यांच्या शब्दाला तितकंच वजनही मिळालं आहे. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या व्हिडीओनं यंदाच्या उत्तर प्रदेश निवडणुकांच्या निमित्तानं पुन्हा सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
ढसाढसा रडत असलो तरीही मला हलक्यात घेऊ नका... असंच जणू योगी तेव्हा त्यांच्या आसवांवाटे सांगत होते. कारण..... ते तुम्ही आम्ही सर्वजण जाणतोच नाही का?