Shocking News : उत्तर प्रदेशातून एक काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. बालपणात सर्वाच्यांच आवडीच्या असलेल्या फुग्याने एका चिमुकल्याचा जीव घेतला आहे. लहान मुलांच्या आनंदाचे कारण असलेल्या या फुग्याने एका घरात शोककळा पसरली आहे. एका फुग्याने एका निष्पाप मुलाचा जीव घेतला आहे. फुगा फुगवत असतानाच मुलाचा जीव गेल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका 10 वर्षाच्या मुलासाठी फुगा फुगवणे जीवघेणे ठरलं आहे. तोंडाने फुगा फुगवत असताना अचानक फुगा फुटून मुलाच्या तोंडात गेला. त्यामुळे मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुटुंबियांनी मुलाला डॉक्टरांकडेही दाखवलं मात्र त्यांनी त्याला मृत घोषित केले. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांची दुरवस्था झाली असून रडत आहे. या घटनेने परिसरातील लोकांना धक्का बसला आहे.
अमरोहा येथील गजरौला येथे हा मुलगा फुगा फुगवत असताना अचानक तो फुटला, त्यामुळे फुग्याचा तुकडा मुलाच्या गळ्यात अडकला. मुलाला तीव्र वेदना होऊ लागल्या. इतर मुले किंचाळू लागली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी उपचार सुरू केले मात्र मुलाचा मृत्यू झाला होता. मुलाच्या गळ्यात फुगा खोलवर अडकला होता. त्यामुळे त्याला वाचवणे कठीण झाले. मुलाच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
खाईखेडा गावात राहणाऱ्या पप्पूचा 10 वर्षांचा मुलगा बॉबी हा पाचवीत शिकत होता. गुरुवारी दुपारी तो घराबाहेर इतर मुलांसोबत खेळत होता. त्यावेळी बॉबीने त्याच्या हातातील फुगा तोंडाने फुगवण्यास सुरुवात केली. मात्र अचानक धक्का बसला आणि तो फुगा बॉबीच्या तोंडात गेला. थोडा वेळ धडपडल्यानंतर तो जमिनीवर पडला. बॉबीसोबत खेळणाऱ्या मुलांनी घरच्यांना माहिती दिली. बॉबीची प्रकृती बिघडली आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी बॉबीला मृत घोषित केले. दहा वर्षांचा निष्पाप मुलगा गेल्याने कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.
दरम्यान, कुटुंबीयांनी कोणतीही कारवाई न करता मृतदेह घरी नेला. रुग्णालयाचे प्रभारी डॉ. योगेंद्र सिंह यांनी सांगितले की, 'मुलाला येथे आणले तेव्हा तो मृत होता. दोन तासांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू कसा झाला हे शवविच्छेदन अहवालात कळले असते, पण शवविच्छेदन करण्यात आले नाही.'