Vice President Election 2022 : भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठी या नावाची चर्चा

भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे.

Updated: Jul 3, 2022, 12:40 AM IST
Vice President Election 2022 : भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठी या नावाची चर्चा title=

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत (Vice President Election 2022) चर्चा सुरु झाल्या आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी कोणत्या नावांची घोषणा केली जावू शकते. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच एक नवीन नाव पुढे आलं आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amrinder singh) यांच्या पंजाब लोक काँग्रेस पक्षाच्या भाजपमध्ये विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान, राजकीय वर्तुळात आणखी एक चर्चा रंगली आहे. भाजपप्रणित एनडीए कॅप्टन अमरिंदर सिंग यांना उपराष्ट्रपती बनवू शकते, अशी चर्चा आहे.

विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2022 रोजी संपत आहे. कॅप्टन यांच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग हे दोन वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

कॅप्टन सध्या उपचारासाठी परदेशात गेले आहेत. ते लवकरच परतण्याची शक्यता आहे. अमरिंदर सिंग दीर्घकाळ काँग्रेसशी संबंधित होते. ते 2002 ते 2007 आणि 2017 ते सप्टेंबर 2021 पर्यंत पंजाबचे मुख्यमंत्री होते. नवज्योतसिंग सिद्धू यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर, पक्षातील परिस्थिती कॅप्टन यांच्यासाठी अस्वस्थ झाली.

कॅप्टन यांचा विरोध असताना ही हायकमांडने पंजाब काँग्रेसची कमान नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडे सोपवली. सिद्धूने आपल्याच कॅप्टन अमरिंदर सिंग सरकारवर निशाणा साधत त्यांच्यावर टीका केली. दरम्यान, पार्टी हायकमांडने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना विश्वासात न घेता पक्ष विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या नकळत बोलावलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमुळे नाराज होऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर पक्षाने चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री केले, परंतु या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडली आणि पंजाब लोक काँग्रेस या नावाने पक्ष स्थापन केला. कॅप्टन यांच्या पक्षाने भाजपशी युती करून निवडणूक लढवली. मात्र, निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या लाटेमुळे कॅप्टन यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. त्यांना ही पराभवाचा सामना करावा लागला.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पक्षाने निवडणुकीत करिष्मा दाखवला नसला तरी कॅप्टन यांची फॅन फॉलोइंग काही कमी नाही. कॅप्टन सैन्यातून निवृत्त झाले आहेत. ते एक कणखर नेते आणि हार न मानणारे सैनिक मानले जातात.

भाजपशी जवळीक होण्याचे कारण आता उपराष्ट्रपतीपदासाठी ते प्रबळ दावेदार मानले जात आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना उपराष्ट्रपती करुन भाजप शीख कार्ड खेळू शकते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीकडे पक्षाचे लक्ष लागले आहे. कॅप्टन यांना उपराष्ट्रपती बनवून भाजप शिख समाजात आपला प्रवेश मजबूत करू शकतो.