Yamunotri Snowfall Viral Video: संपूर्ण भारतामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली असून, देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये जोरदार हिमवृष्टी सुरु आहे. या मोसमामध्ये बर्फाची चादर सर्वत्र पसरत असल्यामुळं देशातील काही तीर्थक्षेत्रांवर भाविकांना प्रवेशबंदी असते. भाविकांचं हित लक्षात घेत हा निर्णय घेतला जात असला तरीही काही देवस्थानांवर मात्र महंत आणि साधुंचा वावर मात्र कायम असतो.
पावसाचा मारा, बरसणाऱ्या गारा असो, कडाक्याचं ऊन असो किंवा अगदी आभाळातून बरसणारा भुरभुरणारा बर्फ असो, भक्तित तल्लिन झालेली ही मंडळी एका अदृश्य शक्तिच्या विश्वासावर आणि अध्यात्माच्या बळावर कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये अगदी सहजपणे वावरताना दिसतात. याचंचच प्रत्यक्ष उदाहरण देणारा एक व्हिडीओ मागील काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ उत्तराखंडमध्ये असणाऱ्या चारधामपैकी एक धाम, अर्थात यमुनोत्री येथील असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच इथं प्रचंड हिमवृष्टी झाली. या हिमवृष्टीच्या स्वागतासाठी तिथं असणाऱ्या साधूंनी शंखनाद करत रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये जणू या शक्तिचेच आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.
नजर जाईल तिथं बर्फच बर्फ दिसत असून, या थंडीमध्ये साधुंनी केलेला शंखनात अध्यात्माची ताकद आणि एखाद्याच्या अंतर्मनावर होणारा सकारात्मक परिणाम दाखवत आहे. तर, कोणत्याही परिस्थितीत भारावणारा क्षण नेमका कसा हेरावा हेसुद्धा हा व्हिडीओ दाखवून जात आहे. साधू भगत दास असं त्यांचं नाव असून, घंटानाद, शंखनाद आणि निसर्गाच्या अद्वितीय आविष्काराची सुरेख सांगड या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
चारधाम यात्रेमधील केदारनाथ आणि यमुनोत्री हे असे दोनच धाम आहेत जे समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर असून, तिथं हिमवर्षावानंतर निसर्गाचं वेगळच रुप पाहायला मिळतं. यमुनोत्री धामपर्यंत पोहोचण्यासाठी काहीशी आव्हानात्मक चढाई करून भाविक मंदिरापर्यंत पोहोचतात. मात्र इथं कायमच तापमान कमी असल्यानं वास्तव्यास परवानगी दिली जात नाही. अशा वातावरणात हे साधू नेमके कसं आयुष्य व्यतीत करतात ही बाब अनेकांसाठी कुतूहलाची आणि औत्सुक्याची ठरत आहे.