नवी दिल्ली : भाजप आणि विरोधकांच्या एकत्रित ताकदीची कसोटी पाहणाऱ्या कैराना लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते हुकूमसिंह यांच्या निधनाने येथे पोटनिवडणूक होत आहे. भाजपने हुकूमसिंह यांची मुलगी मृगांका सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय लोकदलाकडून तबस्सूम हसन या रिंगणात आहेत. त्यांना समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसचा पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघातील निकाल लोकसभेच्या २०१९ च्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल असे मानले जात आहे.
एकूण १७ लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात मुस्लीम, जाट आणि दलितांचे प्रमाण मोठय़ा संख्येने आहे.. कैरानाबरोबरच नागालँडमधील लोकसभेच्या एकमेव जागेसाठीही आज मतदान होत आहे. मुख्यमंत्री नैपीयू रिओ यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. येथे नॅशनल पॉपल्स फ्रंटविरोधात भाजपच्या पीपल्स डेमॉक्रेटिक अलायन्स यांच्यात लढत आहे.
कैरानाबरोबरच उत्तर प्रदेशातील नुरपूर विधानसभा मतदारसंघात आजच मतदान होतंय.. याखेरीज विधानसभेच्या पश्चिम बंगालमधील एक, झारखंडमधील दोन, बिहारमधील जोकीहट आणि मेघालयातील अंपेली येथे पोटनिवडणूक होत आहे. पंजाबमधील शाकोट मतदारसंघात सत्ताधारी काँग्रेस, अकाली दल आणि भाजप असा तिरंगी सामना आहे. अकाली दल आमदाराच्या निधनाने येथे पोटनिवडणूक होत आहे. केरळमधील चेनगूनर मतदारसंघात सत्ताधारी डावी आघाडीविरोधात काँग्रेसची संयुक्त पुरोगामी आघाडी आणि भाजप असा तिरंगी सामना आहे. माकप आमदाराच्या निधनाने ही जागा रिक्त आहे.