मुंबई : पश्चिम-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील ४८ तास कायम राहणार असून त्यानंतर पुढील तीन दिवसांत तो ओमान आणि येमेनच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी येत्या आजपासून पुढचे काही दिवस अरबी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाबरोबरच पृथ्वी-विज्ञान मंत्रालयाने दिला आहे. दरम्यान, १ जूनला मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळमधून मान्सून दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
येत्या ३१ मे ते ४ जून या दरम्यान अरबी समुद्राच्या मध्य आणि आग्नेयेकडच्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून, त्यामुळे केरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वादळाची शक्यता असल्याने समुद्र खवळेला राहू शकतो. त्यामुळे अशीवेळी मासेमारी करणे धोक्याचे असून ते जीवावर बेतू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
कोरोनाच्या संकटात यंदाचा मान्सून अर्थव्यवस्थेला पुन्हा पटरीवर आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. १ जूनला केरळमध्ये मान्सून दाखल व्हायला वातावरण पोषक, असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, याआधी आयएमडीने केरळमध्ये ५ जूनला मान्सून दाखल होईल, असं सांगितलं होतं. भारतातली बहुतेक शेती ही जून ते सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पावसावर अवलंबून असते. यंदाच्या वर्षीचा मान्सून हा सरासरी असेल. यावेळच्या मान्सूनचे प्रमाण १०० टक्के असेल.