मुंबई : Weather Update: आज देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Monsoon)पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने ( IMD) अलर्ट जारी केला आहे. संपूर्ण देशाबद्दल हवामान विभागाने हा अंदाज व्यक्त केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 14 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. देशात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसात हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला आहे.आतापर्यंत मुसळधार पावसामुळे महापूरात 14 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) हिमाचल प्रदेशच्या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट आणि पुढील 48 तासांसाठी आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) 2 ऑगस्टपर्यंत उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज जारी केला आहे. शुक्रवारी (30 जुलै) उत्तरकाशी, देहरादून, टिहरी, पौडी, नैनीताल, बागेश्वर आणि पिथौरागढ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय डेहराडून, नैनीताल, बागेश्वर आणि पिथोरागढमध्ये शनिवार आणि रविवारसाठी यलो इशारा जारी केला आहे, जिथे मुसळधार पाऊस पडू शकतो.
हवामान विभागाने मध्य प्रदेशातील 15 जिल्ह्यांत मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यातील टीकमगड, छतरपूर, सागर, दतिया, शिवपुरी, अनुपपूर, दिंडोरी, नीमच, मंदसौर, रतलाम, बालाघाट, मंडला, श्योपूर, मुरैना आणि भिंड जिल्ह्यात वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये 64.5 मिमी ते 115.5 मिमी दरम्यान पाऊस पडू शकतो.
भारतीय हवामान विभागाने (IMD) राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करताना मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नागौर, सीकर आणि अजमेर जिल्ह्यात मुसळधार ते अतिवृष्टी (115 ते 204 मिमी) होण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जयपूर, झुंझुनू, टोंक, कोटा, भीलवाडा, बरन, चुरू आणि झालावार जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे, ज्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसानंतर लाहौलमधील तोजिंग नाल्यात 10 आणि कुल्लूमधील ब्रह्मगंगेमध्ये 4 जण वाहून गेले. तोजिंग नाल्यात 7 मृतदेह सापडले आहेत, तर तिघांचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर कुल्लूच्या ब्रह्मगंगेमध्ये आलेल्या पुरात बेपत्ता झालेल्या 4 जणांचा शोध सुरू आहे. लाहौल-स्पितीच्या उदयपूरमध्ये अडकलेल्या पंजाब आणि हिमाचलमधील 50 हून अधिक पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री जय राम ठाकूर आज (30 जुलै) लाहौलचा हवाई दौरा करतील आणि परिस्थितीचा आढावा घेतील.