कानपूर : देशात काही ठिकाणी अजूनही उष्णतेची लाट आहे तर काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं धुमाकूळ घातला आहे. काही राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाममध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालं.
बिहारमध्ये वादळी पावसाने कहर केला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळल्याने घरं, झाडं उन्मळून पडली. तर 16 जिल्ह्यात 33 जणांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
बिहारमध्ये कडाक्याच्या उन्हात अचानक पाऊस पडला. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. आता मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात आली असून, नागरिकांनी खबरदारी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
आसाममध्ये पूर परिस्थिती कायम आहे. राज्यात 7 लाख 17 हजार 500 नागरिकांना पुराचा फटका बसला असून, मृतांचा आकडा 10 वर पोहोचला. बचावकार्य अजूनही सुरुच आहे.
आसामच्या राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडून आलेल्या अहवलानुसार, सर्वाधिक पुराचा फटका नागाव आणि कामपूर भागाला बसला आहे. तिथे मोठ्या प्रमाणात घरं पाण्याखाली गेली. शेती वाहून गेली मोठं नुकसान झालं आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे अनेक भागांमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.