कोलकाता : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळाची बैठक होते आहे. तसंच पश्चिम बंगालचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही आजपासून सुरु होतं आहे. मात्र ममता बॅनर्जी धरणं आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी दुरध्वनीवरुन विधानसभेला संबोधित करणार आहेत. पश्चिम बंगालचा अर्थसंकल्प यामुळे आता रस्त्यावरच मांडला जाण्याची शक्यता आहे.
कोलकात्यामध्ये रविवारी संध्याकाळपासून राजकीय नाट्य पाहायला मिळतं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर मनमानीपणाचा आरोप करत धरणं आंदोलन पुकारलं आहे. रविवारी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी सीबीआयचे ५ अधिकारी चौकशी करायला गेले होते. चिटफंड प्रकरणी सीबीआय अधिकारी, पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करणार होते. मात्र कोलकाता पोलिसांनी सीबीआय अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. यानंतर कोलकाता पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी स्वतः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दाखल झाल्या.
दरम्यान ताब्यात घेतलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांची कोलकाता पोलिसांनी मुक्तता केली. तर ममता बॅनर्जी यांनी संविधान बचाव नावाने धरणं आंदोलन पुकारलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुडाचं राजकारण करत असून, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सांगण्यावरुन सीबीआयनं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचा आरोप, ममता बॅनर्जींनी केला. यामुळे पश्चिम बंगाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधला वाद आणखी चिघळला आहे.