Chandrayaan-3 : भारताने पुन्हा एकदा गगनभरारी घेतली आहे. 14 जुलै 2023 रोजी भारताचे चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान 3 मोहिमकडे लागले आहे. चांद्रयानाच्या प्रक्षेपणानंतर सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत आहेत. पृथ्वीच्या दीर्घ वर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घातल्यानंतर 25 जुलै रोजी चांद्रयान-3 पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये असलेल्या कक्षेतून थेट चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 12:00 ते 1:00 दरम्यान ट्रान्सलुनर इंजेक्शनच्या माध्यमातून चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. यानंतर चांद्रयान 3 चंद्राला दीर्घ वर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालत पुढे जाईल. मात्र, चांद्रयान 3 मोहिमेत सहभागी असलेल्या वैज्ञानिकांची खरी परीक्षा होणार आहे ती 24 ऑगस्ट रोजी. या टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्यास भारताचे भविष्य बदलणार आहे.
31 जुलैपर्यंत चांद्रयान 3 एक लाख किलोमीटरच्या कक्षेत नेण्याचे इस्रोच्या शास्त्रज्ञांचे लक्ष्य आहे. चांद्रयान 3 सध्या पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये असलेल्या कक्षेतून थेट चंद्राच्या दिशेने प्रवास करत आहे. 1 ऑगस्ट पासून चांद्रयान 3 चंद्राला दीर्घ वर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालणार आहे. चंद्र 100 किमीच्या कक्षेत आल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांची खरी परीक्षा होणार आहे. चांद्रयान 3 लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं केले जाणार आहे. त्यानंतर लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले जाणार आहे. चांद्रयान 3 मोहिमेतील याच महत्वाच्या टप्प्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल.
चांद्रयान 3 चंद्रावर लँडिंग झाल्यावर पुढे काय?
5 ऑगस्टच्या दरम्यान चंद्राच्या कक्षेत चांद्रयानाचा प्रवेश होईल. 23 ऑगस्टला चांद्रयानाची गती कमी होईल. चांद्रयान 2 मोहिम अपयशी ठरली होती. यामुळे या मोहिमेवेळी झालेल्या चुका विचारात घेऊन चांद्रयान 3 मोहिमेत अनेक बदल करण्यात आले आहेत. विक्रम लँडरच्या पायांची ताकद वाढवण्यात आली आहे. नवे सेंसर्स लावण्यात आले आहेत. गेल्या वेळी लँडिंग साईटचं असलेलं 500 बाय 500 मीटरचं क्षेत्रफळ यंदा 4 बाय अडीच किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आल आहे. यंदा विक्रम लँडरला जास्त प्रमाणात ट्रॅकिंग, टेलिमेट्री आणि कमांड अँटिना लावण्यात आलेत. चूक झालीच तर विक्रम लँडर 96 मिलिसेकंदांमध्ये चूक सुधरु शकतो असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
जगभरात 11 देश चंद्र मोहिमेची तयारी करत आहेत. यामुळे भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यास भारताचा जगभरात दबदबा वाढणार आहे. अमेरिकेसह अनेक देश चंद्रावर स्पेश स्टेशन उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. चांद्रयान 3 चंद्रावरची नवी रहस्य उलगडणार आहे. यामुळे चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यास भारताचे भविष्य बदलणार आहे.