नवी दिल्ली : १ फेब्रुवारी २०१९ ला अंतरिम बजेट सादर केला जाणार आहे. बजेट कोण सादर करणार याबाबत चर्चा सुरु आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली हे यंदा बजेट सादर करणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. अरुण जेटली सध्या उपचारासाठी अमेरिकेला गेले आहेत. त्यांच्या आजाराबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. देशातील लोकांसोबतच राजकीय वर्तुळात देखील याबाबत चर्चा आहे.
अरुण जेटली बजेट सादर करणार का की त्यांच्या ऐवजी अर्थ राज्यमंत्री बजेट सादर करतील. याबाबत प्रश्नचिन्ह आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या आरोग्याबद्दल आणि बजेटबाबत जेव्हा अर्थ खात्याला विचारणा करण्यात आली तेव्हा याबाबत अजूनही कोणतंही उत्तर आलेलं नाही. त्यामुळे जेटली अर्थसंकल्प सादर करणार की नाही या गोष्टीची चर्चा आणखी होऊ लागली आहे.
अर्थमत्री बजेटच्या आधी भारतात येतील अशी देखील चर्चा आहेत. त्यामुळे त्यांचं खातं अजूनही कोणाकडे दिलं जाणार नाही आहे. अरुण जेटली यांची काही दिवसांपूर्वीच किडनी ट्रांसप्लांट झाली होती. ते त्याच्या चेकअपसाठी अमेरिकेला गेले आहेत. दुसरीकडे कॅन्सरच्या उपचारासाठी ते गेले आहेत अशी देखील चर्चा आहे.
२०१९ चं बजेट हे मोदी सरकारसाठी महत्त्वाचं आहे. कारण लवकरच देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. या बजेटमध्ये शेतकरी, मध्यम वर्ग आणि गरीबांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या जावू शकतात. १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या या बजेटकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. हे मोदी सरकारचं कार्यकाळातील शेवटचं बजेट असणार आहे. आगामी निवडणुकीला लक्षात घेऊनच हे बजेट सादर होण्याची शक्यता आहे.