wholesale price index News : महागाई उच्चांक गाठत असताना सर्वसामान्यांच्या हिशोबाचं गणित सातत्यानं कोलमडताना दिसत आहे. यातही जीवनावश्यक वस्तूंपासून अनेक इतरही गोष्टींमध्ये होणारी दरवाढ चिंतेत भर टाकताना दिसते. पण, आता मात्र या संपूर्ण परिस्थितीतून काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण, घाऊक महागाई दरात (WPI) घट झाली आहे. 2023 च्या मार्च महिन्यात महागाई दर घटून 1.34 टक्क्यांवर पोहोचला आहे. आआधी फेब्रुवारी महिन्यात हा दर 3.85 टक्के इतका होता.
सोमवारी या दरात झालेले बदल सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आले. सध्याच्या घडीला समोर आलेला महागाईचा आकडा हा मागील 29 महिन्यांतील नीचांक असल्याचं म्हटलं जात आहे. महागाईच्या या दरांमध्ये झालेल्या बदलांचे परिणाम गहू, डाळी आणि इंधनांच्या दरांवर झाला आहे. किंबहुना या वस्तूंच्या दरात झालेल्या घसरणीमुळेच महागाईचा दरही घसरल्याची माहिती देण्यात आली आहे. असं असलं तरीही दुधाचे चढे दर मात्र कमी झालेले नाहीत.
काही महिने मागे वळून पाहिलं तर, मार्चमध्ये गरजेच्या वस्तूंचा महागाई दर 3.28 वरून 2.40 टक्क्यांवर आला. फेब्रुवारी महिन्यात हे आकडे 2.76 वरून 2.32 टक्क्यांवर आले होते. यामध्ये इंधन आणि वीजेच्या दरांबाबत सांगावं तर फेब्रुवारी महिन्यात या महागाईचा दर 14.82 टक्क्यांवर होता. मार्चमध्ये तो 8.96 टक्क्यांवर पोहोचला.
मार्च महिन्यात किरकोळ महागाईचा दरही घसरून 5.66 टक्क्यांवर पोहोचला. या महिन्यात खाद्यवस्तू आणि रबर, प्लास्टीक, कापडाचे दरही उतरले. कच्चं तेल, नैसर्गिक वायू यांसह कागद आणि कागदी उत्पादनांच्या किमतीत झालेली घटही इथं महत्त्वाची भूमिका बजावून गेली.
महागाईच्या दरांमध्ये होणारे हे चढ उतार पाहता आता सर्वांचच लक्ष, मान्सूनकडे असेल. कारण, हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षी सरासरीच्या सर्वसाधारण प्रमाणात मान्सून झाल्यास याचे थेट परिणाम महागाईचे दर स्थिर ठेवण्यापर्यंत होणार आहेत.