Days getting longer than Night: सध्या दिवस सुरु होतो आणि रात्र उशीरा म्हणजेच पूर्वीपेक्षा आता दिवस मोठा झालेला दिसतोय, हे तुमच्या लक्षात आलंय का? आधी पहाटे 5 वाजता खूप काळोख असायचा. 6 वाजल्यानंतर प्रकाश पडायचा पण आता पहाटे 5 वाजल्यापासूनच उजळत असल्याचे तुमच्या निदर्शनास आलंय का? असं का होतं असेल? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण त्याचे उत्तर फार कमीजण शोधण्याचा प्रयत्न करतात.
रात्रीपेक्षा दिवस मोठा असतो यामागचे कारण वैज्ञानिकांनी सांगितले आहे. हे कारण ऐकून अनेकांना धक्का बसू शकतो. वैज्ञानिकांनी सांगितलेले कारण आपल्या पृथ्वीसाठी देखील धोकादायक आहे. पृथ्वी आपल्या अक्षावर सुमारे 1,000 मैल प्रति तास या वेगाने फिरते. एक राऊंड पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला 23 तास 56 मिनिटे आणि 4.1 सेकंद लागतात. त्यामुळे पृथ्वीच्या एका भागात दिवस आणि दुसऱ्या भागात रात्र असते.
आता एका नव्या संशोधनात पृथ्वीच्या आतील गाभ्याच्या फिरण्याचा वेग कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. एका दशकाहून अधिक काळ रोटेशन मंद आहे. हा ट्रेंड असाच सुरू राहिल्यास दिवसाचा कालावधी वाढू शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. पण असे का होते? यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पृथ्वी गोलाकार फिरण्याचा वेग असाच मंद राहिल्यास संपूर्ण पृथ्वीच्या परिभ्रमणाचे नियम बदलतील, असे तर्क लावण्यात येतोय. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी नेचर जर्नलमध्ये या आशयाचे संशोधन प्रकाशित झाले आहे. समोर आलेल्या संशोधनानुसार, हा ट्रेंड 2010 च्या आसपास सुरू झाला. हा कल असाच सुरू राहिल्यास संपूर्ण ग्रहाची परिभ्रमण बदलू शकणार आहे. वरील कारणांमुळे दिवस हा रात्रीपेक्षा मोठा होऊ शकतो. सायन्स डेलीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दरम्यान दुसरे संशोधक प्रोफेसर विडेल यांनीदेखील या घटनेवर आपले मत प्रकट केले आहे. पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत राहते. आतील गाभ्याचे बॅकट्रॅकिंग एका दिवसाची लांबी एका सेकंदाच्या अपूर्णांकाने बदलू शकते. पण आपल्याला काही जाणवत नाही, असे त्यांनी सांगितले.
संशोधनादरम्यान, शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या आतील गाभ्याच्या फिरण्याच्या गतीचे सतत निरीक्षण केले आणि ते निष्कर्षापर्यंत पोहोचले. त्यांच्या मते, पृथ्वीचा आतील गाभा घन आहे. लोखंड आणि निकेलचा बनलेला आहे. हा आपल्या ग्रहाचा सर्वात उष्ण आणि घनदाट भाग आहे. जेथे तापमान 5 हजार 500 अंश सेल्सिअस आहे. आतील गाभा चंद्राच्या आकाराचा आहे आणि आपल्या पायाखाली 3,000 मैलांपेक्षा जास्त असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.
मनुष्य चंद्रावर पोहोचलाय पण पृथ्वीच्या अंतर्भागापर्यंत पोहोचणे अशक्य आहे. भूकंपाच्या लहरींच्या माध्यमातून या गाभ्याचा अभ्यास करता येतो. गाभ्यामध्ये हालचालींमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीचे हानिकारक सौर विकिरण आणि वैश्विक कणांपासून संरक्षण करते. भूचुंबकीय क्षेत्र जीवांसाठी नेव्हिगेशन सक्षम करत असल्याची माहिती संशोधक देतात.