Death Mystery: करोना महामारीच्या काळात पतीचे निधन झाले. लॉकडाऊन सुरु असल्याने पतीवर मुळ गावी अत्यंसंस्कार होऊ शकले नाही याची खंत कायम पत्नीच्या मनात सलत राहिली. पतीच्या मृत्यूनंतरही पत्नीच्या त्याच्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. म्हणून दोन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या पतीची कबर पुन्हा खोदण्याचा निर्णय पत्नीनी घेतला. तिचा हा निर्णय ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद येथे हा अजब प्रकार समोर आला आहे. केरळ येथे राहणाऱ्या ई.जे पाल यांचे करोना काळात निधन झाले. लॉकडाऊन सुरू असल्याने त्यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी नेण्यात आले नाही. त्यामुळं त्यांच्या पत्नीने फर्रुखाबाद येथेच त्यांच्यावर अत्यंविधी करण्याचा निर्णय घेतला. पतीच्या मृत्यूनंतर व लॉकडाऊन संपल्यानंतर जॉली पाल या पुन्हा त्यांच्या मुळ गावी केरळ येथे परतल्या.
पतीच्या शेवटच्या आठवणी मात्र आपण इथे आणू शकत नाही म्हणून त्या अस्वस्थ होत्या. पतीच्या निधनाला दोन वर्ष उलटून गेले तरी त्यांच्यातील प्रेम कमी झालं नाही. आपल्या पतीच्या आठवणी कायम सोबत राहाव्यात म्हणून जॉली पालने ई.जे यांची कबर पुन्हा खोदण्याची जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली. फर्रुखाबाद येथे दफन केलेले पतीचे अवशेष केरळला त्यांच्या मुळ गावी नेण्याची परवानगी द्यावी, असं त्यात नमूद केलं होतं.
जिल्हा प्रशासनाने जॉली यांच्या पत्रावर सकारात्मक प्रतिक्रिया देत परवानगी दिली. प्रशासनाने पाल यांची कबर पुन्हा खोदून त्यांचे अवशेष बाहेर काढण्यास मान्यता दिल्यानंतर जॉली या तातडीने फर्रुखाबाद येथे रवाना झाल्या.
जॉली पाल यांचे पती शिक्षक होते. दोन वर्षांपूर्वी करोना काळात त्यांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळं त्यांच्यावर मुळ गावी अत्यंसंस्कार होऊ शकले नाही. मात्र आता जॉलीला तिच्या पतीचे अवशेष त्यांच्या मुळ गावी न्यायचे आहेत. जॉली पुन्हा एकदा सर्व विधीनुसार पाल यांचा दफनविधी होणार आहे.
पाल यांचा फतेहगढ येथे दफनविधी करण्यात आला होता. जॉली यांच्या धार्मिक भावना समजून घेत त्यांच्या पतीचे अवशेष त्यांच्या मुळ गावी घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आम्ही त्यांची कबर पुन्हा खोदून त्यातील अवशेष जॉली यांच्या हाती सुपूर्द केले आहेत.