Manipur: 'त्या' व्हिडीओमधील पीडित तरुणीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, 'पोलिसांनीच आम्हाला...'

Manipur Women Paraded Incident: व्हिडीओत दिसणाऱ्या पीडितेने त्या दिवशी नेमकं काय घडलं यासंदर्भातील धक्कादायक खुलासा करताना संपूर्ण घटनाक्रम सांगितला असून तिने राज्यातील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 21, 2023, 09:16 AM IST
Manipur: 'त्या' व्हिडीओमधील पीडित तरुणीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, 'पोलिसांनीच आम्हाला...' title=
या महिलेनेच नेमकं काय घडलं याबद्दल सांगितलं

Manipur Violence Women Paraded Video: मणिपूरमध्ये कुकी समुदायातील दोन महिलांची नग्नावस्थेत धिंड काढल्याचा धक्कादायक व्हिडीओमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या व्हिडीओसंदर्भात भाष्य करताना संताप व्यक्त केला आहे. कोणत्याही आरोपीला सोडणार नाही असा इशाराच मोदींनी दिला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनीही या व्हिडीओसंदर्भात प्रतिक्रिया दिली असताना आता या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या 2 पीडित महिलांपैकी एकीने समोर येऊन नेमकं त्या दिवशी काय घडलं याची आपबिती सांगितली आहे.

14 दिवसांनी नोंदवली तक्रार

ज्या महिलांची धिंड काढण्यात आल्या त्यापैकी एक महिला ही विशीतील आहे तर दुसरी चाळीशीमधील. या महिलांना रस्त्यावरुन शेतात नग्नावस्थेत नेताना जमावामधील पुरुष त्यांचा शारीरिक छळ करत असल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. एका पुरुषाने महिलांच्या छातीवर हात ठेवला आहे तर काही पुरुष या महिलांच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत दिसून आलं. 4 मे रोजी हा संपूर्ण प्रकार घडला. या प्रकरणामध्ये 18 मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली. पीडित महिलांनी केलेल्या आरोपांनुसार, धिंड काढण्यात आलेल्या तरुणीवर दिवसढवळ्या सामुहिक बलात्कार करण्यात आला. 

काय घडल्याचा दावा केला जातोय?

कांगपोकाई गावावर समुदायाने हल्ला केल्यानंतर या गावातील 5 जणांच्या कुटुंबाने आश्रय मिळवण्यासाठी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. मात्र हिंसेदरम्यान जमावाने या लोकांचा पाठलाग सुरु केला. या कुटुंबाला थोऊबल पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी वाचवलं आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ लागले. मात्र पोलीस स्टेशनच्या वाटेवर असतानाच 800 ते 1000 लोक असलेल्या या जमावामधील एका गटाने या पोलिसांना अडवलं आणि बळजबरीने या कुटुंबातील सदस्यांना ताब्यात घेतलं. हा सारा प्रकार पोलीस स्टेशनपासून 2 किलोमीटर अंतरावर घडला.

"हल्लेखोरांबरोबर पोलिसही होते"

मात्र या घटनाक्रमासंदर्भात बोलताना पीडित महिलेपैकी तरुण महिलेने तिच्या पतीच्या फोनवरुन 'इंडियन एक्सप्रेस'ला नेमकं त्या दिवशी काय घडलं हे सांगितलं. "आमच्या गावावर हल्ला करणाऱ्या जमावामध्ये पोलिसांचाही सहभाग होता. पोलीस हल्लेखोरांच्या बाजूने होते. पोलिसांनी आम्हाला आमच्या घरातून ताब्यात घेतलं आणि गावापासून काही अंतरावर घेऊन केले. त्यानंतर त्यांनी अर्ध्या रस्त्यातच आम्हाला जमावाच्या ताब्यात दिलं आणि ते निघून गेले. पोलिसांनीच आम्हाला त्या जमावाच्या ताब्यात दिलं," असा गंभीर आरोप या पीडित महिलेने केला आहे.

नक्की वाचा >> Manipur: नग्नावस्थेत महिलांची धिंड काढणाऱ्या मुख्य आरोपीला अटक; समोर आली धक्कादायक माहिती

पुरुषांची केली हत्या

पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये पीडित कुटुंबातील 5 सदस्य त्यावेळी एकत्र होते असं सांगितलं आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या 2 महिलांबरोबर वयाच्या पन्नाशीमधील अन्य एका महिलेलाही जमावाने विवस्त्र केलं. या जमावाने पीडित तरुण महिलेच्या भावाची आणि वडिलांची हत्या केली, असा उल्लेख तक्रारीत आहे. "पुरुषांना मारुन टाकल्यानंतर त्यांनी आमच्याबरोबर ते कृत्य केलं. आम्ही त्यांच्या तावडीत सापडलो आणि आमच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता," असं पीडितेने सांगितलं आहे.

व्हिडीओची कल्पना नाही

हा संपूर्ण घटनाक्रम व्हिडीओमध्ये रेकॉर्ड करण्यात आल्याची आपल्याला अथवा आपल्या कुटुंबाला कोणतीही कल्पना नव्हती असंही या तरुणीने म्हटलं आहे. मात्र आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकारबरोबर थेट सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. मात्र या घटनेसंदर्भाक दाखल केलेल्या एफआयआरची दखल घेऊन आरोपींना अटक करण्याची कारवाई हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरच करण्यात आल्याबद्दलही संताप व्यक्त केला जात आहे.