Man Exercise Video: दररोज व्यायाम (Exercise) करणं आरोग्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे. काही लोक रोज व्यायाम करतात, तर काही लोक व्यायाम करण्यात खूप आळशी असतात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला व्यायामाची आवड असणारे लोकही पाहिले असतील. पण प्रसिद्ध होण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही.
तरुणाची स्टंटबाजी
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण धोकादायक ठिकाणी लटकून व्यायाम करताना दिसत आहे, ज्याला पाहून लोकांनाही धक्का बसला आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. काही जण लोकं डोंगराच्या माथ्यावरून धोकादायक ठिकाणी व्यायाम करताना दिसत आहेत, तर काही जण इमारतीच्या गच्चीच्या कठाड्याला लटकून व्यायाम करतात.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत हा तरुणही असंच जीव टांगणीला लावून व्यायाम करताना दिसत आहे. रस्त्यातल्या एका उंच पोलला लटकून हा तरुण व्यायाम करताना दिसत आहे. हात जराही निसटले असते तर या तरुणाला गंभीर दुखापतही होऊ शकली असती.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हा तरुण हायवेवर दिशा आणि अंतर दाखवणाऱ्या बोर्डला लटकून कसरत करत होता. हा फलक खूप उंचीवर लावलेला आहे. मुळात त्या पोलवर हा तरुण चढला कसा याची उत्सुकताही लोकांना आहे. या तरुणाच्या अशा धाडसाचं कधीच समर्थन होऊ शकत नाही. त्यामुळे असे व्हिडिओ करताना आपला आणि आपल्या कुटुंबाचा नक्कीच विचार करा.