मुंबई : मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ९ जून ते १२ जून दरम्यान हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोविडसह इतर रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही आणि धोकादायक परिसरातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्याच्या तसेच ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने अतिवृष्टीच्या इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई आणि कोकणातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सुचना कळवण्यात यावी असे सांगण्यात आले आहेत.
दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे जे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले आहेत त्याला तातडीने मंजुरी द्यावी अशा सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, या गावांच्या पुनर्वसनाला लागणारा दीर्घ काळ विचारात घेता आता तातडीची गरज म्हणून या भागातील लोकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे. अशा सुचना ही देण्यात आल्या आहेत.