हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशी तिथीला विशेष असे महत्व आहे. हिंदू पंचांगामध्ये आषाढी एकादशीच्या तिथीला विठुरायाची मोठ्या भक्तीभावाने पूजा आणि आराधना केली जाते. या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी दरवर्षी पायी वारी करतात. या वारीचा महाराष्ट्राला प्राचीन इतिहास लाभला आहे.
आषाढी एकादशीला लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीला जातात. ते आणि त्याहून अधिक भाविक पांडुरंगासाठी आषाढी एकादशीला उपवास धरतात. या उपवासाला 'गोविंद फळ' म्हणजे वाघाट्याचे फळ खाण्याची जुनी परंपरा आहे. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासून हे फळ बाजारात उपलब्ध होते. हे फळ खाऊन उपवास सोडण्याची परंपरा आहे. या फळाला धार्मिक महत्त्व तर आहेच पण सोबतच आयुर्वेदिक आणि आरोग्यदायी असे देखील महत्त्व जे आज आपण पाहणार आहोत.
वर्षातून एकदा मिळणारं हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शरीरातील विषारी घटक आणि कफ कमी करण्यासाठी गोविंद हे फळ खाल्लं जातं. महत्त्वाचं म्हणजे नागीन या आजारावरही गोविंद फळ गुणकारी औषध म्हणून खाल्लं जातं. हे फळ कडू असल्यामुळे त्याची भाजी देखील खाल्ली जाते.
एका वेलीवर हे फळ येते. हे फळ पेरु किंवा लिंबासारखे भासते. झाडावर लिंबू किंवा पेर लटकावं असं ते फळ जाणवते. गोविंद हे फळ अतिशय कडू असून हे फळ खाणं सोपं नाही. म्हणून अनेकजण याची भाजी देखील करुन खातात.
महाराष्ट्रातील सर्वच जंगलातमध्ये गोविंद फळ मिळते. अनेक भागातून पंढरपूरकडे जाणारे वारकरी आपल्यासोबत गोविंद हे फळ घेऊन जातात. पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेऊन पांडुरंगाच्या चरणी अनेक भाविक गोविंद फळ वाहतात. पांडुरंगाला हे फळ अर्पण केलं जाते. त्यामुळे या फळाला 'गोविंद फळ' असं म्हटलं जातं.
पांडुरंगाला अर्पण केलं जाणारं हे फळ आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. श्वात घेताना छातीत किंवा पोटात जळजळ होत असेल तर गोविंद फळ गुणकारी आहे. लहान मुलांना अनेकदा पोटदुखी किंवा कफ हा त्रास अधिक असतो. अशावेळी हे फळ गुणकारी ठरते. शरीरातील मळमळ, ताप कमी करण्यासाठी आणि जुलाबावर उपाय म्हणून हे फळ गुणकारी ठरते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)