दहीचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत. दही हा एक थंड पदार्थ असून लोक वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसोबत याचा आस्वाद घेतात. आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच चवीच्या बाबतीत सुद्धा लोक दही खाणं पसंत करतात. परंतु, असे काही खाद्यपदार्थ आहेत, ज्यांच्यासोबत दही खाल्ल्याने त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊयात, अशा खाद्यपदार्थांविषयी ज्यांच्यासोबत दही खाणं टाळलं पाहिजे.
अनेकदा बरेच लोक आपल्या आहारात दही आणि फळ एकत्रितपणे खाणं पसंत करतात. परंतु, फळासोबत दहीचे सेवन हे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरु शकते. खासकरुन, आंबट फळे जसे की संत्री, द्राक्षे किंवा लिंबू यांच्यासोबत दह्याचे सेवन केल्याने पोटात गॅसची समस्या उद्भवू शकते आणि पचनसंस्थेत अडथळे निर्माण होऊ शकतात. आंबट फळे आणि दही हे दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने पचतात आणि यामुळेच पोटात पचनासंबंधी असंतुलन निर्माण होऊ शकते.
मासे आणि दह्याचे एकत्रितपणे सेवन सुद्धा पचनसंस्थेच्या समस्येला कारणीभूत ठरु शकतात. माशांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात जी आरोग्यासाठी आवश्यक असतात. तसेच, दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. म्हणूनच माशांचे आणि दह्याचे एकत्रितपणे सेवन केल्याने पचनसंस्था सुरळीतपणे चालण्यात अडथळे येऊ शकतात. यामुळे पचन हळू होण्याची शक्यता असते. तसेच, पोटात गॅस अणि जडपणा जाणवू शकतो.
बटाटे आणि दह्याचे एकत्रितपणे सेवन हे अनेकदा पोटातील वेदनेला आणि सूजेला कारणीभूत ठरतात. बटाट्यात मोठ्या प्रमाणात स्टार्च असते आणि दह्यात लॅक्टिक अॅसिड असते. हे दोन्ही पदार्थांच्या पचनाची पद्धत ही वेगवेगळी आहे. एकत्रितपणे यांचे सेवन केल्यास पोटातील समस्या उद्भवू शकतात.
भारतीय लोक साखर आणि दही खाणं शुभ मानतात. बऱ्याचजणांना तर दह्यात साखर घालून खाणे अत्यंत आवडते. परंतु, दही आणि साखर एकत्रितपणे अधिक प्रमाणात खाल्ल्याने पचनासंबंधी समस्या उद्भवू शकतात. साखर आणि दह्याचे एकत्रितपणे सेवन पचनक्रियेला मंद करु शकते. दही आणि साखरेचे सेवन शरीरातील अॅलर्जी किंवा सूजेला कारणीभूत ठरु शकते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)