हेमंत चापुडे, झी मिडीया
शिरूर/पुणेः लहान मुलांच्या हातात मोबाईल देणे महागात पडू शकते. (Mobile Blast In Pune) अनेकदा पालक मुलं जेवत नसली की किंवा मुलांचे लक्ष भरकटवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल देतात. मात्र हीच सवय मुलांसाठी घातक ठरु शकते. पुण्यात अशीच एक घटना घडली आहे. ज्यामुळं एकच खळबळ माजली आहे. पुण्याच्या शिरुर येथे मोबाईलचा स्फोट झाल्याने दहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा घटना सातत्याने घडत आहेत. (Pune mobile explosion)
साहील नाना म्हस्के असं मोबाइलच्या स्फोटात जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. शिरुर तालुक्यातील पिंपळसुटी येथे ही घटना घडली आहे. मोबाईलचा स्फोट होताच पालकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.
साहीलवर पुण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या डोळ्याला आणि पायाला गंभीर इजा झाली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान मोबाईलचा स्फोट कसा झाला याची अद्याप माहिती कळू शकलेली नाहीये.
काही दिवसांपूर्वी, रायगड जिल्ह्यातही मोबाईलमुळं सहा वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी झाली होती. अनिता वाघमारे असं या मुलीचं नाव असून मोबाइल पाहत असताना अचानक मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. या दुर्घटनेत अनित गंभीर जखमी झाली असून तिच्या तोंडाला दुखापत झाली होती. गंभीर जखमी असल्याने अनिताला मुंबईतील जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असताना पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या काही दिवसांत मुलांबाबत अनेक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहेत. तसंच, मुलांच्या हातात मोबाईल देतानाही पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांचा स्क्रीन टाइम ठरवून घ्या. ठराविक वेळेनंतर मुलांच्या हातात मोबाईल देण्याचे टाळा. मुलांनी कितीही हट्ट केला तरी त्यांना नाही ऐकण्याची सवय लावा. कोवळ्या वयात मोबाईलचे व्यसन पुढे जाऊन मुलांसाठी हानिकारक ठरु शकतो.
मोबाईल चार्जिंग करण्यासाठी ओरिजनल चार्जर वापरा. डुप्लिकेट चार्जरमुळं स्फोट होण्याची शक्यता असते.
मोबाईल सूर्यप्रकाशात ठेवून चार्ज केल्याने गरम होतो व त्याचा बॅटरीवर परिणाम होऊ शकतो.
मोबाईल फुल्ल चार्ज झाल्यानंतरही चार्जिंग सुरू ठेऊ नये. त्यामुळं फोन गरम होतो व त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते.