पुणे : कोरोना व्हायरसने भारतात प्रवेश केला असून महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३१ वर गेली आहे. यात सर्वात जास्त १५ रुग्ण पुण्यात आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांनी महापालिकेचे सर्व गार्डन्स बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना जंतूचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातली २०२ गार्डन्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व गार्डन्स अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. सर्व नागरिकांसाठी पुढील आदेश येईपर्यत पूर्ण वेळ गार्डन्स बंद ठेवण्यात येणार आहेत.
कोरोनाचा एसटी वाहतुकीलाही फटका बसला आहे. स्वारगेट डेपोने दोन फेऱ्या रद्द केल्या आहेत. पुण्यातील प्रसिद्ध सिद्धीविनायकाचं मंदिरही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलं आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश दिले आहे. तर दुसरीकडे पुण्यामध्ये कोरोनाच्या भीतीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
पुणे | शहरातील २०२ गार्डन्स बंद
कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी गार्डन्स बंदhttps://t.co/HOK58cBO5u#Pune #Coronaindia— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 15, 2020
राज्यातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३१ वर गेली आहे. पुण्यात सर्वाधिक १५ रुग्ण आहेत. त्या खालोखाल मुंबई, नागपूर शहरात कोरोनाचे रुग्ण आढळलेत. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, कामोठेत प्रत्येकी एक रुग्ण आढळलाय. तर यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण झालीय. कोरोनाच्या रूग्ण संख्येत सध्या देशात महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानावर आहे. सर्वाधिक रूग्ण केरळात आढळले आहेत.