सोनू भिडे, नाशिक- अटींची पूर्तता न केल्याने नाशिक मधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला २२ अभ्यासक्रम बंद करावे लागले आहे. यात सहा महिने, एक वर्ष आणि तीन वर्ष्याच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यापीठाला तांत्रिक आणि पूर्णवेळ अभ्यासक्रम राबविण्याची परवानगी नसताना सुद्धा हे अभ्यासक्रम राबविल्याने २२ अभ्यासक्रम बंद करावे लागले आहेत.
मुक्त विद्यापीठ
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना १९८९ मध्ये झाली आहे. याचे मुख्य केंद्र नाशिक मध्ये असून आठ विभागीय केंद्र आहेत. या विद्यापीठात दहावी आणि बारावी नापास झालेले विद्यार्थी पुढील शिक्षण पूर्ण करू शकतात. विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थी एकाच वेळी दोन शिक्षणक्रम पूर्ण करू शकतात. मुक्त विद्यापीठाच्या पदव्यांना यूजीसी आणि राज्य सरकारची मान्यता आहे.
या कारणाने बंद करावा लागला अभ्यासक्रम
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियम आणि अटी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सहा महिने, एक वर्ष तीन वर्षाचे अनेक अभ्यासक्रम आहेत. गेली कित्येक वर्ष या विद्यापीठात ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या अभ्यासक्रमात तांत्रिक आणि पूर्णवेळ चालणारे अभ्यासक्रम सुद्धा सुरु करण्यात आले होते. मात्र यूजीसीचे नियम आणि अटींचे पालन न केल्याने अभ्यासक्रमांना बंद करण्याचे आदेश दिले होते. तरीही विद्यापीठाने हे अभ्यासक्रम सुरु असल्याची तक्रार युजीसीकडे वारंवार करण्यात आली. अखेर युजीसीने विद्यापीठातील बऱ्याच वर्षापासून सुरु असलेले २२ अभ्यासक्रम बंद करण्याचे जाहीर केले आहे. मात्र या निर्णयाने हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून त्यांना इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा लागणार आहे.
कोणते अभ्यासक्रम होणार बंद
युजीसीने जाहीर केलेल्या निर्णयानुसार विद्यापीठातील खालील विविध प्रकारचे अभ्यासक्रम बंद होणार आहेत.
प्रमाणपत्र कोर्स
या अभ्यासक्रमातील बंद होणारे कोर्स
१ सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर फंडामेंटल, २ सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर फायनान्शियल अकाउंटिंग, ३ सर्टिफिकेट इन प्रोग्रामिंग एक्सपटॉईज सी, ४ सर्टिफिकेट इन डाटा स्ट्रक्चर यूजिंग सी, ५ सर्टिफिकेट इन ओओपीएस अॅण्ड सी प्लसप्लस, ६ सर्टिफिकेट इन लिनक्स, ७ सर्टिफिकेट इन ओरॅकल, ८ सर्टिफिकेट इन मॅथेमॅटिक्स, ९ सर्टिफिकेट इन व्हिज्युअल प्रोग्रामिंग, १० सर्टिफिकेट इन इंग्लिश लॅग्वेज, ११ सर्टिफिकेट इन जर्मन लँग्वेज, १३ सर्टिफिकेट इन अरेबिक लँग्वेज, १४ सर्टिफिकेट इन फ्रेंच लँग्वेज.
डिप्लोमा कोर्स
१ पीजी डिप्लोमा इन फायर अँण्ड सेफ्टी मॅनेजमेंट, २ डिप्लोमा इन फेब्रिकेशन, ३ डिप्लोमा इन फॅसिलिटी सर्व्हिसेस, ४ पी. जी. डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट, ५ पी. जी. डिप्लोमा इन अॅडव्हर्टाइजमेंट मीडिया अॅण्ड इव्हेंट.
पदवी अभ्यासक्रम
१ बीएससी (ऑटोमोटिव्ह टेक्निक्स, व्ही-७२, विथ क्रेडिट डिस्टन्स एज्युकेशन), २ बी.एस्सी. कन्स्ट्रक्शन प्रक्टिसेस, ३ बी. कॉम को-ऑपरेटिव्ह मैनेजमेंट.
वरील अभ्यासक्रमात तुमचा प्रवेश असेल तर तुम्हाला तुमचा कोर्स पूर्ण करता येईल मात्र नवीन कोर्स करण्याचा विचार करत असाल तर प्रवेश मिळणार नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.