नागपूर : गणेशोत्सवाच्या काळात एसटी प्रशासनाने महिला कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. यापुढे एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना ९ महिन्यांची प्रसुती रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रसुती काळात मिळणाऱ्या हक्काच्या ६ महिन्यांच्या रजेसह ३ महिन्यांची अतिरिक्त रजा देण्याचा निर्णय यावेळी झाला.
प्रसुतीपूर्व रजा मिळत नसल्याने महिला कर्मचाऱ्यांना गरोदर अवस्थेत प्रवास करावा लागतो. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय होणे गरजेचे होते. यासंबंधीची मागणी वेळोवेळी होत होती. अखेर परिवहन विभागाने याची दखल घेतली. सरकारी नियमानुसार एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांची प्रसुती रजा दिली जाते. ती रजा कधी घ्यायची हा संबंधित महिला कर्मचाऱ्यांचा निर्णय असतो.
अनेकदा महिला वर्ग बाळाच्या जन्मानंतर या रजेचा वापर करतात. पण आता या निर्णयानंतर त्यांना रजेचा पुरेपूर वापर करता येणार आहे.
एसटी महामंडळातर्फे या निर्णयासंबंधीचे परिपत्रक काढण्यात आले आहे. मातृत्त्व कोणत्याही स्वरुपात हिरावून घेतलं जाऊ नये, त्याचा सन्मान झाला पाहिजे, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एसटी महामंडळाने यामध्ये म्हटले आहे.
अतिरिक्त ३ महिन्यांची प्रसुती रजा देण्यात आल्याने एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. परिवहन खात्याने घेतलेल्या या निर्णयाचे एसटीतील महिला कर्माचाऱ्यांनी स्वागत केले आहे.