18 वर्षीय विद्यार्थ्याच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून...; नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचं निर्घृण कृत्य, पीडित म्हणाला 'मित्राच्या रुमवर नेऊन...'

हॉस्टेलवर राहणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थ्याला पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केली आहे. विद्यार्थ्याला तोंडात रुमालाचा बोळा कोंबून काठीने मारहाण करण्यात आली.  

शिवराज यादव | Updated: Jan 15, 2025, 05:20 PM IST
18 वर्षीय विद्यार्थ्याच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून...; नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचं निर्घृण कृत्य, पीडित म्हणाला 'मित्राच्या रुमवर नेऊन...' title=

नीटची तयारी करणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थाला पोलीस कर्मचाऱ्याने हॉस्टेलवर बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्याच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून त्याला अत्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे,  हॉस्टेलमधील रुममध्येच त्याला मारहाण करण्यात आली. नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला आहे. 

माहूर तालुक्यातील आसोली येथील प्रथमेश पुरी हा 18 वर्षीय विद्यार्थी नांदेडमध्ये नीट परीक्षेची तयारी करत आहे. श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमध्ये तो इतर विद्यार्थ्यांसोबत राहतो. 5 जानेवारी रोजी पोलीस कर्मचारी आकाश सावंत रात्री उशिरा हॉस्टेलवर आला. या पोलीस कर्मचाऱ्यासोबत अन्य दोन युवक तिथे आले होते. मोटारसायकल आणि सोन्याची चैन चोरी केली का? असं विचारून तिघांनी प्रथमेश याला बाहेर नेलं. अशोकनगर, गोकुळनगर, आसना नदी परिसरात नेऊन त्याला बेदम मारहाण केल्याचं प्रथमेशने सांगितलं आहे. 

नंतर दुसऱ्या दिवशी 6 जानेवारीला पुन्हा पोलीस कर्मचारी आकाश सावंत हॉस्टेलवर आला. यावेळी त्याने प्रथमेशच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून त्याला काठीने जबर मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ हॉस्टेवरील एका मुलाने न कळू देता आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. घाबरलेल्या मुलाने काही दिवस हा घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. नंतर त्याच्या वडिलांना सर्व प्रकार त्याने सांगितला. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्यासह इतर दोघांवर कारवाई केल्याची माहिती आहे

प्रथमेश पुरी याने सांगितल्यानुसार, "एक पोलीस कर्मचारी आला आणि रात्री 11.30 वाजता दरवाजा ठोठावला. महाराष्ट्र पोलीस आहे, तुझ्याशी बोलायचं आहे सांगून ते मला खाली घेऊन गेले. खाली नेल्यानंतर मला मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतर मला पाण्याच्या टाकीखाली असणाऱ्या रुममध्ये नेऊन मारहाण केली. यानंतर मित्राच्या रुममध्ये नेलं आणि तिथेही मारलं. हॉस्टेलमध्येही तिघांनी मला खूप मारहाण केली".

पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत ज्या पोलिसाचं नाव आहे त्याला निलंबित करण्यात आला आहे. ज्या दिवशी घटना घडली तेव्हाही तो कामावर आला नव्हता".