Pune Crime News : एका तरुणीचे बारामतीच्या तरुणासोबत लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध होते. लग्न झाल्यावर देखील त्या दोघांमध्ये भेटीगाठी होत होत्या. या प्रेम प्रकरणाबाबत तिच्या पती आणि भावाला माहिती समजली. त्यांनी या तरुणाला पकडले. बिबवेवाडी परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 2 डिसेंबर 2023 रोजी घडली होती. भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून बिबवेवाडी पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला होता. यापूर्वी घेण्यात आलेल्या जबाब आणि तपासात बिबवेवाडी पोलिसांना संशयास्पद वाटले. त्यामुळे या गुन्ह्याच्या खोलात जाऊन तीन महीने तपास करीत हा खूनच असल्याचे निष्पन्न करण्यात आले. बिबवेवाडी पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे
संग्राम हनुमंत साळुंके (वय २२, रा. वडकेनगर, बारामती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन रेणुसे (रा. अष्टविनायक नगर, आंबेगांव पठार, धनकवडी), आदित्य गवळी, अनिकेत चव्हाण यांच्यासह दोन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्राम हा बारामतीचा राहणारा होता. त्याची प्रेयसी गायत्री नितीन रेणुसे धनकवडी येथील आंबेगाव पठार येथे राहण्यास आहे. ती विवाहित होती. या दोघांमध्ये लग्नापूर्वीच प्रेमसंबंध निर्माण झालेले होते. दरम्यान, तिचे लग्न झाले. मात्र, त्यांचे प्रेम संबंध कायम होते. संग्राम तिला भेटायला पुण्यात येत असे
दरम्यान, त्यांच्या या प्रेम संबंधांबाबत तरुणीचा पती नितीन रेणुसे याला माहिती मिळाली. संग्राम हा २ डिसेंबर २०२३ रोजी बिबवेवाडी येथील किया सर्व्हीस सेंटरजवळ या तरुणीला भेटायला आला होता. त्यावेळी आरोपी रेणुसे, गवळी, चव्हाण यांच्यासह त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. तो ठरलेल्या ठिकाणी येताच आरोपींनी त्याचे अपहरण केले. त्याला मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून त्याला क्रिकेट मैदानाजवळ नेऊन मारहाण करण्यात आली. त्यानंतर, अप्पर इंदिरानगर येथील गॅस गोदामाजवळ नेले. तेथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यापश्चात निलसागर सोसायटीजवळ नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली.
दरम्यान, संग्रामच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झालेली होती. त्याच्या कवटीचा काही भाग त्याच्या पोटात ठेवण्यात आलेला होता. त्यानंतर पुन्हा त्याच्यावर आणखी एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली जाणार होती. याची माहिती आरोपींना होती. मात्र, तरीदेखील त्याला डोक्यावर व शरीरावर ठिकठिकाणी हाताने तसेच कठीण वस्तूने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संग्रामला तेथेच टाकून आरोपी पसार झाले होते. दरम्यान, जखमी तरूणाबाबत पोलिसांना माहिती मिळाली
हे ठिकाणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या जवळ असल्याने याच पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून हा गुन्हा बिबवेवाडी पोलिसांकडे वर्ग केला होता. दरम्यान, संबंधित तरुणी, साक्षीदार यांचे जबाब नोंदविण्यात आलेले होते. वरिष्ठ निरीक्षक विपिन पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संजय निकुंभ यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. या पोलीस अधिकाऱ्यांना यापूर्वी नोंदवण्यात आलेल्या तरुणीच्या जाब जबाबात आणि साक्षीदारांच्या जबाबात तफावत आढळून आली होती. यासोबतच या तरुणीने दिलेल्या माहितीमध्ये संग्रामला नशा करण्याची सवय होती. त्यामुळे तो पडून जखमी झाल्याचे नमूद केलेले होते.
शवविच्छेदन अहवालात मात्र मृत्यूचे कारण जबर मारहाण असे नमूद करण्यात आलेले होते. ही तरुणी चुकीची माहिती देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी पुन्हा तपासाची चक्रे गतीमान केली. पुन्हा साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. नव्याने तपासाला सुरुवात करण्यात आली. या तरुणीकडे खास पोलिसी पद्धतीने तपास करण्यात आला. त्यावेळी हा खूनच असल्याची कबुली देण्यात आली. त्यानंतर, आरोपींकडे देखील तपास करण्यात आला. हा खूनच असल्याचे निष्पन्न होताच रेणुसे आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय निकुंभ तपास करत आहेत.