OBC On Maratha Reservation : ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात आरक्षणाचा वाद पेटणार आहे. राज्य सरकार विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून थेट रस्त्यावर उतरुन आपला संताप व्यक्त केला आहे. पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जीआरची होळी करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करत सरकारने घेतलेल्या निर्णयावर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.
सरकारने काढलेला जीआरचा ओबीसी कार्यकर्त्यांनी जाळून निषेध व्यक्त केला आहे. मराठा कुणबी, कुणबी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने तयार केलेल्या मसुद्याची प्रत ओबीसी कार्यकर्त्यांनी जाळली. सगे सोयरे शब्दाचा समावेश या अध्यादेशात करण्याचं प्रस्तावित आहे. त्याला ओबीसींकडून विरोध होत आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी पुण्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर ओबीसी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. त्यांनी आज अध्यादेशाच्या मसुद्याचं दहन केलं.
मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाल विरोध करत असाल तर ओबीसींचं 27% आरक्षण रद्द करणार असा मोठा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मंडल आयोग आम्ही स्वीकारलेला नाही. मात्र मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करत असाल तर मग त्यालाही आव्हान देण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. मंत्री छगन भुजबळ जर मराठा आरक्षणाला आव्हान देत असतील तर आम्हीही ओबीसींना आव्हान देऊ असा जाहीर इशारा जरांगेंनी दिलाय..
आपली शपथ पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ओबीसींना पायदळी तुडवलं, अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.. मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये चर्चा न करता जीआर काढला. सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे, असंही ते म्हणाले. ओबीसींवरील अन्यायाच्या विरोधात येत्या 5 फेब्रुवारीपासून ओबीसी नेते चैत्यभूमीपासून शक्तिप्रदर्शनाला सुरूवात करणार आहेत. तसंच संभाजीनगरला 20 फेब्रुवारीला ओबीसींची विराट सभा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासंदर्भातल्या जीआरचा मसुदा तयार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आमच्या चर्चा केली नसल्याचा आरोप ओबीसी नेते आणि अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळांनी केलाय. तसंच मराठा समाजाचं सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीनं सुरू असल्याचा आरोपही भुजबळांनी केला आहे.