Agriculture Minister Abdul Sattar In Trouble : शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. याला कारण ठरणार आहे तो त्यांचा मुलगा. छत्रपती संभाजी नगरच्या बुढी लेन भागातील वादग्रस्त जागेवरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत येण्याची शक्यता आहे. हायकोर्टाची मनाई असताना महापालिकेनं तिथल्या अतिक्रमणांवर कारवाई केलीय. महापालिकेनं ही कारवाई अब्दुल सत्तार यांच्या मुलासाठी केलीय का? असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होत आहे.
या जागेचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसच कोणत्याही कारवाईला मनाई आहे. असं असताना त्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं महापालिका आयुक्त जी.श्रीकांत यांना अवमानतेची नोटीस बजावलीय. बुढी लेन भागातील जागेचा वाद असून या जागेवरील अतिक्रमाण काढण्यात यावं यासाठी अब्दुल सतातर यांचा मुलगा समीर सत्तार यानं महापालिकेकडे अर्ज केला होता. मात्र याचिकाकर्त्यांनी खंडपीठात धाव घेतल्यानं कोर्टानं या जागेबाबत मनाई आदेश दिले होते असं असतानाही पालिकेनं कारवाई केल्यानं महापालिका प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
या प्रकरणात, दाखल केलेल्या याचिकेनुसार, याचिककर्त्यांचा मालकीची बुढीलेन भागातील सर्व्हे नं. 3194 मधील सात हजार 186 चौरस मीटर जागा आहे. यातील एक हजार 784 चौरस मीटर जागा ही शेख मसूद यांची तर उर्वरीत जागा ही शेख हसनोद्दीन कमाल व शेख उमर यांची आहे. मात्र, संबंधित जागा ही आपली असून त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे, असा एक अर्ज विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार व त्यांचा मुलगा समीर सत्तार यांनी 22 डिसेंबर 2020 रोजी मनपाकडे दिला होता. त्यावर याचिकाकर्त्यांनी खंडपीठात धाव घेतली.
तत्कालीन न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी जागेला अंतरिम संरक्षण दिले. हे आदेश 8 जून 2023 पर्यंत कायम होते. ही याचिका निकाली काढताना खंडपीठाने या प्रकरणी दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचे सूचित केले तसेच अंतरिम संरक्षण 45 दिवस वाढविले. तसेच याचिकाकर्त्यांच्या जागेच्या प्रश्नी मनपाला सुनावणी घेण्याचे आदेश दिले. मात्र, आजच या जागेचा ताबा घेण्यासाठी मनपाचे अधिकारी, पोलीसही पथकासह संबंधित ठिकाणी दाखल झाले होते.
यावर महानगरपालिकेने तातडीने म्हणजे 14 जून 2023 रोजी याचिकाकर्त्यांना नोटीस काढून 16 जून रोजी सुनावणी निश्चित केली. मात्र, जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याने याचिकाकर्त्यांनी खंडपीठात तातडीने अवमान याचिका दाखल केली. न्यायप्रविष्ट असलेल्या आणि सुनावणी प्रलंबित असलेल्या प्रकरणात जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खंडपीठाने महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांना व्यक्तिशः अवमानना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी 19 जून रोजी आहे.