Maharashtra Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील हजारो मराठ्यांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत. शनिवारी अंतरवली सराटी येथून निघालेला मोर्चा आज पुण्यात पोहोचणार आहे. सध्या देशाचे अयोध्येत होत असलेल्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लक्ष लागलं आहे. या सोहळ्याविषयी विचारले असता आपण रेल्वे भरुन लोकांना अयोध्येला नेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
प्रभू श्रीराम यांच्या प्रतिष्ठापणेनिमित्त अहमदनगर शहरातील भिंगार भागातील श्रीराम मंदिरात मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी या परिसरातील नागरिकांनी देखील आरतीसाठी हजेरी लावली. आरती संपल्यानंतर जरांगे पाटील यांच्या मंदिर संस्थानच्या वतीनं सत्कार देखील करण्यात आला. आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरून अयोध्येला दर्शनासाठी जाणार असल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली.
आमचं आंदोलन नियोजित असल्याने अयोध्येला जाऊ शकलो नाही. आमच्या आंदोलनातच रामप्रतिष्ठापणा सोहळा साजरा करणार आहे," असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगेंसोबत आलेल्या आंदोलकांसाठी दोन क्विंटलचा खिचडी भात
मनोज जरांगे पाटलांचा आजचा तीसरा मुक्काम रांजणगाव गणपती येथे होणार आहे. या निमित्ताने 150 एकर जागेवर जाहीर सभा होत आहे. मनोज जरांगे पाटलांसोबत लाखोंचा जनसमुदाय त्यांचे विचार ऐकण्यासाठी रांजणगाव मध्ये येणार आहे. येणाऱ्या मराठा आंदोलकांसाठी शिरूर तालुक्यातील गावागावतून तब्बल चार लाख भाकरी, चपाती, चटणी गोळा करण्यात आल्या असून दोन क्विंटलचा खिचडी भातही शिजवला जाणार आहे.