कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar Crime) संगमनेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संगमनेरच्या (sangamner) कोल्हेवाडी गावातील एका तरुणाचा ठरलेला विवाह गावातीलच एका व्यक्तीने मोडून स्वतःच लग्न त्याच मुलीबरोबर ठरवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात त्या तरुणाला बोलावून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर तरुणाने टोकाचा निर्णय घेत थेट गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
कोल्हेवाडीतील नितीन सिताराम खुळे (वय 32) या तरुणाने सोमवारी वडगावपान शिवारातील बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी या तरुणाने त्याच झाडाखाली बसून आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ शूट केला होता. व्हिडीओमध्ये तरुणाने त्याच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे. त्यानंतर नितीनने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
याशिवाय त्याच्याजवळ एक डायरी देखील आढळून आली आहे. या डायरीमध्ये नितीनला इतक्या टोकाचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडणाऱ्या काही लोकांची नावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी यासाठी गावकऱ्यांनी तब्बल 30 तास मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. शेवटी रात्री उशिराने गुन्हा दाखल झाल्यानंतर नितीनच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास संगमनेर पोलीस करत आहेत.
नेमकं काय घडलं?
नितीन खुळे याला लग्नासाठी त्याच्या कुटुंबियांनी मुलगी पाहिली होती. मात्र मुलीच्या घरच्यांनी नंतर लग्न मोडले, असे सांगितले. मात्र त्याच मुलीचे लग्न संदीप शिवाजी दिघे याच्या बरोबर होणार असल्याचे कळाल्याने नितीन यास राग आला. नितीनने संदीप याला शिवीगाळ केली. त्यानंतर नितीनला ग्रामपंचायतीमध्ये बोलावून घेण्यात आले होते. त्यावेळी नितीनला अमोल अप्पासाहेब दिघे, राजेंद्र देवराम दिघे, जालिंदर मच्छिंद्र दिघे, राहुल भास्कर दिघे, सुधाकर बलसाने यांनी बोलावून दमदाटी केली. थोड्या वेळात नितीन रडत बाहेर आला. त्यानंतर त्याने जंगलातील एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
"पोलीस निरीक्षकांकडे मी त्या दिवशी सुद्धा रात्री आलो होतो. मला लोकांनी इतका त्रास दिलेला आहे. राजकारणाचा धाक दाखवून गावातील लोकांवर अन्याय करण्यात आला आहे. माझी आत्महत्या करण्याची इच्छा नाही. आई वडिलांचे माझ्यानंतर काय होईल याचीही मला कल्पना नाही. पण या लोकांनी मला एवढा त्रास दिला. ही गोष्ट कुणालाही सांगू शकत नाही. मी एक सर्वसामान्य अतिशय गरीब घरातील मुलगा आहे. माझ्यासोबत गावातील कोणीही व्यक्ती नाही. माझी विनंती आहे की कोणत्याही राजकारणाला बळी न पडता माझ्या आई वडिलांना न्याय देण्यात यावा," असे नितीन खुळे याने शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
"नितीनचं लग्न जमलेलं असताना गावातील एकाने त्या मुलीला पाहिलं. त्या मुलीला आम्ही मोबाईल आणि 50 हजार रुपये दिले होते. मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीने मुलीला त्या दुसऱ्या व्यक्तीला दाखवले. त्यानंतर दोघांचे लग्न जमलं आणि आम्हाला नकार दिला. त्यामुळे वाद वाढत गेला. त्यानंतर आम्ही वाद मिटवून घेतला. सगळं सुरळीत चाललं होतं. पण त्यांनी मुलाला ग्रामपंचायतीमध्ये बोलवून घेतलं आणि दम दिला. दम दिल्यामुळे त्याने आत्महत्या केली," असे नितीनच्या आईने सांगितले.
कुटुंबियांच्या फिर्यादीवरून प्रदीप भाऊसाहेब शिंदे, संदीप उर्फ संतोष शिवाजी दिघे, पोपट उर्फ बाजीराव सावळेराम कोल्हे, नानासाहेब कोल्हे (सर्व रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध कलम 306, 504, 506, 34 प्रमाणे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.