Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या गटासह महायुतीत सामील झाले. अजित पवार महायुतीत गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा दावा सातत्याने त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून व कार्यकर्त्यांकडून केला जातो. अनेकदा बॅनर व होर्डिंगवरदेखील तसा उल्लेख आढळतो. अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असतो. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी केक आणला होता. या केकवरील मजकुरामुळं पुन्हा एकदा दादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार यांच्या तोंडून मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की... असं ऐकावे अशी इच्छा गेली कित्येक दिवस कार्यकर्ते बाळगून आहेत. ते स्वप्न वास्तवात कधी उतरणार हा प्रश्न असला तरी आज सकाळी अजित पवार यांनी स्वतः मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की हे वाक्य वाचले. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे.
अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. त्यांनी सकाळी सांगवीमध्ये अतुल शितोळे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांचा मुलगा आदिराज शितोळे आणि त्याच्या साथीदारांनी दादांसाठी केक आणला होता. अजित पवार यांचा २२ जुलैला वाढदिवस असल्याने त्यांनी दादांना केक कापण्याचा आग्रह केला. एरवी अजित पवार केक कापत नाहीत. पण त्यांनी केक पहिला आणि केकवर लिहलेला मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की... हा मजकूर वाचला आणि दादांनी केक ही कापला. कार्यकर्त्यांच्या या प्रयत्नांची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि इतर 25 आजी-माजी नगरसेवक शरद चंद्र पवार गटामध्ये गेल्यानंतर पिंपरी चिंचवड चा बालेकिल्ला पुन्हा मजबूत करण्यासाठी स्वतः अजित पवार मैदानात उतरले आहेत पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर असताना आज अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वैयक्तिक गाठीभेटी घेत आहेत. अजित पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी ही मोठी गर्दी केली आहे.