Akshay Shinde Death: बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराचा (Badlapur Sexual Assault) आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्यानंतर त्याच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून, 3 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) बदलापुरात अंत्यसंस्कार करण्याला नागरिक विरोध करत आहेत. त्यातच आता अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांनी मृतदेह पुरणार असल्याचं सांगितलं आहे. अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन करणार नाही तर त्याचा मृतदेह पुरणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील अमित कटारनवरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, "पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह पुरणार आहे. अक्षयच्या मृतदेहाचं दहन नाही तर पुरणार आहे. ज्यामुळे भविष्यात भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. परंतु मृतदेह पुरण्यासाठी देखील जागा मिळत नाही. आम्हाला आमच्या मुलाला न्याय मिळवून द्यायचा आहे, अशी कुटुंबाची भावना आहे. त्यासाठी कुटुंबाचा हा प्रयत्न आहे की, अक्षयचा मृतदेह शक्य तितका जतन करुन ठेवू. म्हणून आम्ही दहन करणार नाही तर पुरणार आहे".
दरम्यान अक्षय शिंदेच्या कुटुंबियांना आज त्याचा मृतदेह मिळणार नाही. कोर्टाने पोलिसांना पुन्हा एकदा अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे घेण्याचे आदेश दिले आहे. पुन्हा एकदा फॉरेन्सिक टीम अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे घेणा आहे, त्यामुळे त्याच्या कुटुंबियांना त्याचा मृतदेह आज मिळणार नाह.
दरम्यान अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नसल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या वकीलांनी कोर्टात केला. बदलापूरच्या मांजर्ली स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असून कुणीही विरोध करून नये असं आवाहन पोलिसांनी केलं होतं.
अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी हायकोर्टानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सुनावणी दरम्यान हायकोर्टानं सरकारी वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती करत हे एन्काऊंटर होऊच शकत नाही असं म्हटलं. दरम्यान याप्रकरणी आजची सुनावणी संपली असुन पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी एन्काऊंटर प्रकरणातील फॉरेन्सिक अहवाल तसंच एन्काऊंटरमध्ये सहभागी असलेल्या सर्व पोलिसांचे सीडीआर सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.