विशाल करोळे झी मीडिया,औरंगाबाद : राज्यभर मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा केला जात आहे. मात्र औरंगाबादमध्ये फुलंब्री तालुक्यात जळगाव गावामध्ये सणावर विरजण टाकणारी घटना समोर आली आहे. बैलाला धुण्यासाठी गेलेल्या चुलता आणि पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला आहे. चुलते पंढरीनाथ कचरू काळे वय 33, आणि रितेश अजिनाथ काळे वय 18 अशी मृत काका-पुतण्याचं नावं आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
बैलपोळ्या दिवशी बैलांना सजवलं जातं आणि गावामधून एक फेरी मारून आणतात. प्रत्येकजण आपली बैलजोडी हौसेनुसार सजवतो. अशाच प्रकारे पंढरीनाथ आपली बैलं धुण्यासाठी पाझर तलावात घेऊन जातात. त्यावेळी मदतीला आपल्यासोबत पुतण्या रितेशला घेतो. तलावाच्या काठावर काका पुतणे बैल धुवत होते.
बैल धुवत असताना एक बैल पंढरीनाथ यांना धक्का देतो. त्यामुळे काकांच्या हातातील दोरी सुटते आणि ते तलावात पडतात, काकांना पाहून रितेशही पाण्यात उडी घेतो. मात्र दोघेही पाण्यात बुडतात, आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांना वाचवण्यासाठी कोण येत नाही. ज्यावेळी गावकऱ्यांना याची खबर लागते तोपर्यंत उशिर झालेला असतो.
दोघांनाही पाण्यातून बाहेर काढलं जातं आणि ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात येतं. डॉक्टरा तपासून दोघांनाह मृत म्हणून घोषित करतात. सणावेळी झालेल्या काका पुतण्याच्या मृत्यूने काळे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.