Aarti Anil Deshmkh Cancer Health Update: नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सलील देशमुख लढणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पक्षातर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यासाठी काटोल बाजार समिती काटोल येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, रमेश बंग यांनीदेखील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पत्नीला कॅन्सर झाल्याची माहिती त्यांनी जाहीर सभेत दिली. दरम्यान सलील देशमुख यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन मिनिटांचा उशीर झाल्यामुळे आज अर्ज स्वीकारला नाही. ते उद्या मंगळवारला सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जाहीर सभेदरम्यान अनिल देशमुख यांनी पत्नी आरती देशमुख यांना झालेल्या कॅन्सरविषयी कार्यकर्त्यांना माहिती दिली.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले की शरद पवार मला पहिला एमएलसी करणार आहेत. मला मंत्री करणार आहेत.मात्र तुम्ही सलीलला काटोलमधून निवडून आणा, असे आवाहन यावेळी अनिल देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केले. या निवडणुकीत मविआ चे उमेदवार सलील देशमुख यांच्या फॉर्म भरण्यासाठी मी येथे असल्याचे अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
भाजपचे सरकार गेल्या 3 वर्षांपासून माझ्या मागे लागले आहे. मला तुरुंगात टाकायचे असेल तर टाका. मी फॉर्म भरला तर त्याच्यात काही तांत्रिक अडचणी काढायच्या आणि गडबड करून रद्द करण्याचा प्रयत्न करायचा त्यांचा प्लान होता. मी कोर्टात गेलो की मग वेळ मारून नेणार होते. म्हणून मी फॉर्म भरला नसल्याचे ते म्हणाले. रश्मी बर्वे यांच्या प्रमाणे करायचे. अनिल देशमुख निवडणुकीत उभे राहायला नको, निवडून यायला नको, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला. चांदीवाल समितीने खोट्या आरोपात मला फसवण्यात आल्याचे सांगितले आहे.मला देवेंद्र फडणवीस आणि वरचे रंगा बिल्ला यांनी फसवले. माझे पुस्तक बाहेर आले आहे. जळगावचे गिरीश महाजन यांना धमकावल्या प्रकरणात दीड महिन्यांपूर्वी माझ्यावर सीबीआय केस लावल्याचे ते म्हणाले.
सलीलला मी उमेदवारी फॉर्म भरायला सांगितला. माझ्या मागे सीबीआय लावतील म्हणून मी सलील ला फॉर्म भरायला लावला. सलील देशमुखांना तुम्ही निवडणून दिले तर मला शरद पवार विधान परिषदवर पाठवतील. मला मंत्री मंडळातही घेतील. मात्र त्यासाठी सलीलला निवडणून द्या.मला 30 वर्षे प्रेम दिलं तसेच प्रेम या निवडणुकीत सलीलला प्रेम आणि आशीर्वाद द्या, असे आवाहान अनिल देशमुख यांनी मतदारांना केले. बांधकाम मजूर किट वाटपचे शिबीर भाजपच्या मतदारसंघात लावले.सलील देशमुख हायकोर्टात गेले. आचारसंहिता संपल्यावर काटोलमध्ये शिबीर लावण्याचे आदेश कोर्टाने दिले. सलील देशमुख यांची लहान मुलगी सारा देशमुख हिने वडिलांना मतदान करण्याचे आवाहन यावेळी केलं.
अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना कॅन्सर झाल्याची माहिती यावेळी समोर आली. अनिल देशमुख यांनी स्वत:कार्यकर्त्यांना याबद्दल माहिती दिली. भाजपच्या सरकारने मला जो त्रास दिला त्याच्या काळजीमुळे आरती देशमुख यांचा कॅन्सर बळावला. 14 किमो त्यांनी घेतलेयत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आमचा परिवार ही गोष्ट विसरला नाहीय, असे यावेळी अनिल देशमुख म्हणाले. यावेळी आरती यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सलील देशमुख यांना निवडून द्यायचे आहे, असे आवाहन आरती यांनी कार्यकर्त्यांना केले.