नाना पटोले यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्यांनाच नोटीस पाठवा - देशमुख

Ashish Deshmukh on Show Cause Notice : नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे, जर नोटीस द्यायची आहे तर ती नाना पटोले यांना द्यावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली. मी काँग्रेसच्या हिताची भूमिका घेत आहे, शिस्तपलन समिती आणि वरिष्ठांना माझी भूमिका समजावून सांगणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही,असे ते म्हणाले.

Updated: Apr 8, 2023, 01:04 PM IST
नाना पटोले यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्यांनाच नोटीस पाठवा - देशमुख title=

Ashish Deshmukh on Show Cause Notice : काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार गेले आहे. त्यामुळे पक्षाने त्यांनाच कारणे दाखवा नोटीस द्यायला हवी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे. आशिष देशमुख यांना काँग्रेस पक्ष शिस्तपालन समितीने कारणे दाखवा नोटीस देत त्यांचे पक्षातून निलंबन केले आहे. त्यावर देशमुख यांनी ही टीका केली आहे. 

नाना पटोले यांच्यावर तेव्हापासून संशयाची सुई 

आशिष देशमुख म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे कारणे दाखवा नोटीस मला देण्यात आली आहे. जी दोन कारणे देण्यात आली आहेत त्या संदर्भात माझे म्हणणे आहे की, मी जी काही भूमिका घेतली ती काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या हितासाठी घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर सभेला अनुपस्थिती आणि नागपूर सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी टाकलेला खोडा आहे, विधानसभेचे अध्यक्ष असताना तडकाफडकी राजीनामा दिला, तेव्हापासून संशयाची सुई नाना पटोले यांच्यावर आहे. 

काँग्रेस नेते आशिष देशमुखांना यांना कारणे दाखवा नोटीस 

दरम्यान, आशिष देशमुख यांनी स्पष्ट केले आहे की, नोटीसीला मी लवकरच सविस्तर उत्तर देणार  आहे. मी इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. शुक्रवार, शनिवार ,रविवार असा मोठा विकेंड आल्याने विमानाच्या तिकीट वाढल्याने मी पुणे मार्गे नागपुरात आलो. शरद पवार गेल्या आठवड्यात माझ्या शेतावर येऊन गेले म्हणून येवढ्या लवकर त्यांना भेटण्याचा प्रश्न नाही. मी काँग्रेसच्या हिताची भूमिका घेत आहे, शिस्तपलन समिती आणि वरिष्ठांना माझी भूमिका समजावून सांगणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.

नाना पटोले हे हाय कमांडशी घनिष्ट संबंध असल्याचे म्हणतात. पण नाना पटोले यांनादेखील शिस्त भंगाची नोटीस दिली पाहिजे. कारण नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे, जर नोटीस द्यायची आहे तर ती नाना पटोले यांना द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.