मुंबई : राज्यातील काँग्रेस संपविण्याचा विडा प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उचलाय. त्यांच्या जिल्ह्यात काँग्रेस नावापुरते उरली आहे, अशी जोरदार टीका ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी चव्हाण यांच्यावर केली होती. मात्र, नांदेड महापालिका निवडणुकीत विरोधकांचा सुफडा साफ करीत एकहाती काँग्रेसची सत्ता आणून चव्हाण यांनी राणेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलेय.
राणे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती. यांना काँग्रेसचे भले करायचे नाही. त्यामुळे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त केली. असं इथं काय घडलंय की, जिल्हा कार्यकारणी बरखास्त करावी लागली. आम्ही सिंधुदुर्गात काँग्रेसला चांगले दिवस आणून दिले म्हणून हे फळ का, असा सवाल राणे यांनी केला होता.
भाजप प्रवेश इच्छुक नारायण राणे यांनीही विरोधकांबरोबर काँगेसच्या नेत्यांवर मोठे आरोप केले. त्यानंतर राणेंनी काँग्रेसचा त्याग करत नवा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि आपली वेगळी चूल मांडली. महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे ते आता राजकारणात काय चमत्कार करतात याकडे लक्ष लागेलय.
तसेच राणेंसोबत माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे यांनीही अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे नांदेड पालिकेत काय होणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला होती. मात्र, अशोक चव्हाण यांनी राणेंच्या टीकेला निकालातून चोख उत्तर दिलेय. नांदेड पालिकेत काँग्रेस ७३ जागा मिळाल्यात. तर भाजपला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागेल.
दरम्यान, राणे यांनी अशोक चव्हाण यांना लक्ष्य केले. त्यावर अशोक चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता पालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले. अशोक चव्हाण यांनी बांधलेल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा जोडून घेतले. भाजप हा पक्ष फसवणूक करणारा आहे, हे काँग्रेसचे नेते सांगत गेले. त्यात जसे स्थानिक विषय होते तसेच राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील उदारहरणे दिली गेली. नोटबंदीपासून ते शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे अनेक विषय मतदारांपर्यंत फसवणुकीची उदाहरणे म्हणून ठेवण्यात आली आणि काँग्रेसच्या पदरी मतदारांनी भरभरुन टाकले.
नांदेड महापालिकेमध्ये मिळालेली ही एकहाती सत्ता केवळ स्थानिक प्रतिक्रिया होती, असे भाजपची मंडळी आता सांगू लागली आहेत. पण, भाजप विषयीचा रागही या मतदानातून दिसून आलाय. दरम्यान, काँग्रेस आणि चव्हाण यांच्यावर जोरदार टीका होत असताना निवडणूक रणधुमाळीमध्ये अशोक चव्हाण यांनी प्रचाराची पातळी खाली घसरु दिली नाही. अगदी नारायण राणे यांनी टीका केल्यानंतर त्यांना माझ्या शुभेच्छा, एवढेच सांगत उत्तर दिले.