चॅम्पिअन्स ट्रॉफीतून वगळल्यानंतर संजू सॅमसनचे वडील क्रिकेट असोसिएशनशी भिडले, म्हणाले 'जर माझ्या मुलाला....'

भारतीय क्रिकेटर संजू सॅमसनला (Sanju Samson) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy) निवडण्यात आलेल्या संघातून वगळण्यात आलं आहे. केरळच्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) मोहिमेतील अनुपस्थितीमुळे त्याला संधी नाकारण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 21, 2025, 02:45 PM IST
चॅम्पिअन्स ट्रॉफीतून वगळल्यानंतर संजू सॅमसनचे वडील क्रिकेट असोसिएशनशी भिडले, म्हणाले 'जर माझ्या मुलाला....' title=

आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली आहे. मात्र निवड समितीचा प्रमुख अजित आगरकरच्या (Ajit Agarkar) नेतृत्वातील समितीने निवडण्यात आलेल्या संघात संजू सॅमसनला (Sanju Samson) स्थान न देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतरही संजू सॅमसनच्या जागी ऋषभ पंत आणि के एल राहुल यांना प्राथमिकता देण्यात आली आहे. चर्चांनुसार, केरळच्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) मोहिमेतील अनुपस्थितीमुळे संजू सॅमसनला डावलण्यात आलं. दरम्यान यावरुन संजू सॅमसनच्या वडिलांनी केरळ जिल्हा असोसिएशनवर संताप व्यक्त केला आहे. तेथील अधिकाऱ्यांचा माझ्या मुलाविरोधात काही तरी राग आहे असं ते म्हणाले आहेत. 

संजू सॅमसन केरळ कॅम्पचा भाग नव्हता, ज्यामुळे त्याची संघाच्या विजय हजारे ट्रॉफी मोहिमेसाठी निवड करण्यात आली नाही. संजू सॅमसनने आपण विजय हजारे ट्रॉफीसाठी उपलब्ध नसू असं आधीच स्पष्ट केल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे केरळ क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख जयेश जॉर्ज यांनी त्याने फक्त एका वाक्य पाठवणं योग्य नसल्याचं म्हणत नाराजी जाहीर केली. 

"केरळ क्रिकेट असोसिएशनमधील काही लोक माझ्या मुलाच्या विरोधात आहेत. आम्ही याआधी कधीही असोसिएशनच्या विरोधता कधी बोललेलो नाहीत. पण यावेळी फारच झालं आहे. कॅम्पला न जाणारा संजू सॅमसन एकमेव खेळाडू नाही. तरीही काही खेळाडूंना मात्र खेळण्याची संधी देण्यात आली," असं संजू सॅमसनचे वडील विश्वनाथ मातृभूमी इंग्लिशशी संवाद साधताना म्हणाले आहेत.

मात्र KCA शी पुन्हा एकदा संवाद साधला जावा आणि आपल्या मुलाला पुन्हा संधी मिळावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. "हे जयेश जॉर्ज (केसीए अध्यक्ष) किंवा विनोद एस कुमार (बोर्ड सेक्रेटरी) बद्दल नाही; हे काही लहान लोक आहेत जे क्षुल्लक गोष्टींवरून सर्वकाही विषात बदलतात. आम्ही खेळाडू आहोत, खेळाच्या व्यवसायात रस नाही. मला फक्त एवढेच हवे आहे की माझ्या मुलाला खेळण्याची योग्य संधी मिळावी. जर काही चूक झाली असेल तर आम्ही चर्चेसाठी खुले आहोत आणि ती दुरुस्त करण्यास तयार आहोत," असं ते पुढे म्हणाले.

दरम्यान, केसीएचे प्रमुख जॉर्ज म्हणाले आहेत की जर सॅमसन केरळच्या शिबिरांना उपस्थित राहिला तर तो पुन्हा निवडीसाठी पात्र ठरेल. "संजू सध्या कोलकातामध्ये आहे आणि इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. याबद्दल अधिक काही सांगता येत नाही. परंतु जर तो शिबिरांना उपस्थित राहिला तर तो पुन्हा केरळ संघात असेल. जर तो शिबिरात सहभागी झाला नाही तर त्याला वगळण्यात येईल," जॉर्ज म्हणाले.