नितेश महाजन, झी मीडिया, जालना : राज्यात २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार असून २४ ऑक्टोबरला याचा निकाल लागणार आहे. त्यामुळे विधानसभेची रणधुमाळी सध्या सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाची करडी नजर उमेदवार आणि त्यांच्या हालचालींवर आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारावर आचारसंहीता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
जालन्यातील बदनापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू उर्फ रुपकुमार चौधरी यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मंदिरात विना परवानगी सभा घेतल्याचं सिद्ध झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
चौधरी हे तिसऱ्यांदा बदनापूर मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. चौधरी यांनी मंदिरात विना परवानगी सभा घेऊन आचार संहितेचा भंग केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली होती.