मुंबई, जळगाव : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर आमदार अमरीश पटेल यांच्या पाठोपाठ नंदुरबार जिल्ह्यातील आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी ही काँग्रेस पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
खान्देशातून काँग्रेस पक्षचे अस्तित्व संपते की काय? अशी भिती निर्माण झाली आहेत. कारण आमदार अमरीश पटेल यांच्या पाठोपाठ नंदुरबार जिल्ह्यातील आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी ही काँग्रेस पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार रघुवंशी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
नंदुरबार जिल्ह्या हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र या बालेकिल्ल्याला रघुवंशी यांच्या रूपाने एक मोठं खिडार पडला आहे असे म्हणावे लागेल. आमदार रघुवंशी हे नंदुरबार काँग्रेस कमिटीचे जिल्हाद्यक्ष असून ते हजारो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी दोन वाजता होणार मातोश्रीवर प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीचा काळात काँग्रेसला मोठा धक्का आहे.
तर कोकणातील काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधासभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपविला आहे. त्यांनी तो मंजूरही केला. नारायण राणे यांनी नितेश राणे आणि नीलेश राणे या आपल्या दोन मुलांसह भाजपमध्ये प्रवेशासाठी तयारी करीत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, भाजपकडून त्यांचा पक्ष प्रवेश लांबवणीवर पडत आहे. भाजप प्रवेशाचा मुहूर्त अद्याप लागलेला नाही. त्यामुळे तूर्तास तरी त्यांचे काय होणार, हा प्रश्न आहेच. दरम्यान, नितेश राणे यांचा कणकवली देवगड मतदारसंघ भाजपकडे असल्याने नितेश राणे येथून भाजपकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.