Crime News : औरंगाबादमध्ये (aurangabad news) एका तरुणाच्या आढलेल्या मृतदेहामुळे एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादच्या वाळूज (waluj midc) परिसरात हा मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे 22 ते 25 वर्षे वय असलेल्या या तरुणाचा मृतदेह एका बंद पडलेल्या कंपनीत सापडला आहे. तरुणाचा मृतदेह जमिनीत अर्धवट पुरण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाचे धड आणि शीर वेगळे करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Aurangabad Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे.
बंद पडलेल्या कंपनीत आढळला मृतदेह
एमआयडीसी वाळूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज एमआयडीसीतील पथेजा फोर्जींग नावाची कंपनी असून गेल्या काही वर्षांपासून ती बंद पडली आहे. कंपनी बंद पडलेली असली तर लोक त्यातून साहित्य चोरी करुन नेत असतात. रविवारी सकाळी काही जण बंद पडलेल्या कंपनीत गेले असता त्यांना एका खड्ड्यात तरुणाचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला. घाबरलेल्या लोकांनी पोलिसांना तात्काळ याची माहिती दिली.
मृतदेहाची ओळख मिटवण्याचा प्रयत्न
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता खड्डात तरुणाचा धडापासून शीर वेगळा केलेला मृतदेह आढळून आला. अधिक चौकशीत तरुणाच्या धडापासून मुंडके वेगळे केले असल्याची माहिती समोर आली. याशिवाय तरुणाचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. तरुणाच्या अंगावर शर्टही नव्हता. तसेच मृत तरुणाच्या हातावर छत्रपती असे लिहिले होते अशी माहितीही समोर आली आहे. तसेच मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली असून तपास सुरु केला आहे. हत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून फॉरेन्सिक आणि श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे. दुसरीकडे मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी गुन्हे शाखेचे पाच आणि स्थानिक पोलिसांचे तीन अशा एकूण आठ पथकांनी तपास सुरु केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली आहे.