विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याने सरकारविरोधातील आंदोलन आपण पाहीली असतील पण हे आंदोलन थोडं वेगळं आहे. आपल्या नवऱ्याविरोधात खुद्द होममिनिस्टरने हे बंड पुकारले आहे. नवरा अमेरिकेहून परत येत नाही म्हणून एक बायको चक्क उपोषणाला बसली आहे. सासरच्या दारातच तिचं धरणं आंदोलन सुरू आहे. औरंगाबादमधल्या वैजापूरमध्ये हे आंदोलन पाहायला मिळतं असून साऱ्या राज्याचं लक्ष या आंदोलनाकडे लागलं आहे.
'अमेरिकेतून येत कसा नाही, आलाच पाहिजे', 'सून येथे आणि मुलगा अमेरिकेला, अशा सासू सासऱ्यांचं करायचं काय', 'मुलीवरचा अन्याय समाज आता सहन करणार नाही' अशा घोषणांनी वैजापूर दणाणून गेलंय. नवरा अमेरिकेला जाऊन बसलाय, परतच येत नाही, म्हणून एका बायकोनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे. प्राजक्ता डहाळे असं या आंदोलनकर्त्या तरुणीचं नाव आहे. ती थेट सासरच्या दारातच आंदोलनाला बसली आहे. तिच्याबरोबर तिचं अख्खं कुटुंबही उपेषण आणि धरणं आंदोलन करतंय. आणि मुलगा अमेरिकेहून परत कधी येणार ? असा प्रश्न विचारत आहे.
माझे पती अमेरिकेला गेले पण आता वारंवार सांगुनही ते परत येत नाहीत म्हणून आंदोलनाचा मार्ग अवलंबल्याचे नवरी मुलगी प्राजक्ता डहाळे सांगते.
दाराबाहेर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे अखेर सासऱ्यांना बाहेर यावं लागलं. मुलगा १३ तारखेला येणार आहे... मग सगळं सुरळीत होईल असे मुलीच्या सासऱ्यांनी सर्वांसमोर जाहीर केले. मुलगा १३ तारखेला परत येईल. १४ फेब्रुवारीला व्हॅलंटाईन डे आहे. संसार पुन्हा गोडीगुलाबीनं सुरू करण्यासाठी मुहूर्तही चांगलाय.