मयुर निकम, बुलडाणा : यंदा मान्सून वेळेत दाखल झाल्यानं राज्यात ठिकठिकाणी पेरणीची कामं सुरू झाली आहेत. अशावेळी बियाणं महामंडळाकडून प्रत्येक शेतक-याला बियाणं मिळणं अपेक्षित आहे. मात्र बुलडाण्यात शासकीय अनागोंदीमुळे अनेक शेतक-यांवर खासगी कंपन्यांचं महागडं बियाणं विकत घेण्याची वेळ आलीय.
शेतक-यांचं बियाणं कुणी चोरलं ?
बुलढाणा जिल्ह्यातल्या घाटावरील भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं. दरवर्षी शेतक-यांना स्वस्त दरात बियाणं उपलब्ध करून दिलं जातं. मात्र यंदाच्या वर्षी कृषी विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतक-यांवर खासगी कंपन्यांचं बियाणं विकत घेण्याची वेळ आलीय. कृषी विभागानं जाहीर केलेल्या यादीत शेतक-यांच्या नावासमोर उपलब्ध बियाणांची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात आपल्याला बियाणं मिळालंच नाही असं शेतक-यांचं म्हणणं आहे.
त्यामुळे कृषी विभागाने बनवलेली यादी खरी की खोटी असं अधिका-यांना विचारलं असता ही यादी आम्हीच बनवल्याचं जिल्हा कृषी अधिका-यांनी सांगितलं. आता ही यादी अंदाजे तर बनवण्यात आली नाही ना असा सवाल शेतक-यांनी उपस्थित केलाय. यादीमध्ये काही शेतक-यांच्या नावे 2 एकर जमीन आणि त्यांच्या नावावर 24 ते 25 क्विंटल बियाणं उपलब्ध दाखवण्यात आलंय.
लॉकडाऊन आणि मालाला भाव नसल्यानं आधीच शेतकरी मेटाकुटीला आलाय. त्यात आता शासकीय अनागोंदीचा फटका शेतक-यांना सहन करावा लागतोय. त्यामुळे शेतक-यांमधून संतापाची लाट उसळली आहे.