मुंबई : मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीय. ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही मुसळधार पाऊस आहे. या पावसाचा फटका मुंबई लोकल रेल्वेसेवेलाही बसलाय. मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं सुरू आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना नेहमीप्रमाणेच अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान, बदलापूर - कल्याण रेल्वे वाहतूक ठप्प झालीय. रुळांवर साचलं पाणी साचल्यानं रेल्वे सेवा ठप्प झालीय.
मुसळधार पावसाने कल्याणच्या सखल भागात पाणी साचलंय. कल्याण एपीएमसी मार्केट, शिवाजी महाराज चौक, जोशी बाग, मोहम्मद अली चौक, जरीमरी आदी परिसरात पाणी साचलंय. तर काही ठिकाणी दुकानात पाणी गेल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झालंय. रात्रीपासून कल्याण आणि परिसराला पावसाने झोडपलंय. कल्याणसह आसपासच्या परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण स्टेशनवरील रुळावर पाणी साचायला सुरुवात झालीय.
Due to heavy rains, suburban trains are running with cautious speed causing some delays but no hold up of traffic as of now. Inconvenience is regretted.@drmmumbaicr @RidlrMUM @m_indicator
— Central Railway (@Central_Railway) August 3, 2019
ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे ठाण्यातील विविध भागात पाणी साचण्यास सुरूवात झालीय. ठाण्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आलीय. नागरिकांनी महत्त्वाची कामे असतील तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन सुरक्षा यंत्रणेनं केलंय.
बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर परिसरामध्ये काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे . मधून - मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून अजूनही सखल भागात पाणी साचल्याच्या कोणतीही घटना समोर आली नाहीय. मात्र, संपूर्ण परिसरात ढग दाटून आले असल्याने सर्वत्र काळोख पसरला आहे.
मुंबईतील विविध भागात रात्रभर पाऊस सुरु आहे. वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरिवली परिसरात पाणी साचलंय. अंधेरी आणि मालाड सबवे पाण्याखाली गेलाय. त्यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आलीय. रात्रभर सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही सखल पाणी साचलंय. दहिसर पूर्व इथल्या काही इमारतीमध्ये पाणी भरलंय.