लातूर : लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस ला आणखी एक धक्का बसला आहे. बीड नगर पालिकेतील काकू नाना आघाडीच्या दहा अपात्र नगरसेवकांना मतदानाचा अधिकार बहाल केला असला तरी त्यांच्या मताची मोजणी गरज पडल्यास करावी अन्यथा करू नये असा आदेश न्यायालयाने दिला आहे नगराध्यक्षांच्या दालनात कचरा टाकल्याप्रकरणी बीड न. पा.च्या उपाध्यक्षांसह १० नगरसेवकांना नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अपात्र ठरवले होते. मात्र सोमवारी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत त्यांना मतदानाची मुभा दिली होती.
या अपात्रतेच्या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. ‘विधान परिषद निवडणुकीत या सदस्यांच्या मतदानाचा अधिकार कायम राहील. मात्र त्यांच्या मतांचा निकालावर परिणाम होत असेल तर तो निकाल जाहीर करू नये’, असे निर्देश न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी रविवारी दिले.
बीड उस्मानाबाद लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी आज मतदान होत आहे,एकूण 1006 मतदार आपला हक्क बजावणार असून मताची आकडेवारी पाहता राष्ट्रवादी काँग्रेस कडे संख्याबळ जास्त असल्याचे दिसून येते मात्र तरीही भाजपने सुरेश धस यांच्यासाठी लावलेला जोर पाहता ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. विधानपरिषद च्या या जागेसाठी भाजपने माजीमंत्री सुरेश धस यांना तर राष्ट्रवादीने अशोक जगदाळे यांना मैदानात उतरवले आहे.