मुंबई : शेतकऱ्यांच्या समस्यांचे योग्य पद्धतीने निवारण होत नसल्यामुळे पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींनी अंदोलन सुरु केले होते. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या मध्यस्तीनंतर उपोषणाला पूर्णविराम मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या मुलींनी मांडलेले प्रश्न महत्वाचे आणि योग्य असल्याचे खोतकर यांनी सांगितले. तसेच दोन दिवसांत यावर सविस्तर चर्चा करु, असे अश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास, पुन्हा उपोषणाला सुरुवात करु असाही इशारा शेतकऱ्यांच्या मु्लींनी सरकारला दिला.
शेतकरी संपाची संकल्पना मांडणारे पुणतांब्यातील धनंजय जाधव यांच्या मुलीने उपोषणाला सुरुवात केली होती. तिचे संपूर्ण नाव निकिता जाधव असे आहे. ती विधी शाखेत शिक्षण घेत आहे. तिच्यासह शुभांगी, पुनम राजेंद्र जाधव या दोघी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. महत्वाची बाब म्हणजे या तिघीजणीं अठरा ते एकोणीस वयोगटातील आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, संपूर्ण कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत, कृषीसंलग्न वस्तुंवरील जीएसटीतून माफी, सुक्ष्मसिंचन, कृषी अवजारांवरांना शंभर टक्के अनुदान, शेतीमालाला हमीभाव, दुधाचे दर वाढून मिळावेत, अशा अनेक मागण्यांसाठी पुणतांब्यातील तीन मुलींनी अन्यत्याग आंदोलन सुरू केले होते.
सलग पाच दिवसांनंतर खोतकर यांना या उपोषणाला तोडगा काढण्यास देण्यात यश आले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणीवर सविस्तर चर्चा करुन त्यावर काही तोडगा काढू असेही ते म्हणाले आहे. दरम्यान आमच्या मागण्या मान्य न झाल्यास, आम्ही पुन्हा या उपोषणाला सुरुवात करु असे ठामपणे सांगितले. शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांच्या मुलींनीही उडी घेतल्याचे बघण्यात आले आहे.