अमर काणे, झी २४ तास, नागपूर : ऑनलाईन परीक्षेतही कॉपी कशी करायची, याचे धडे द्यायला काही मुन्नाभाईंनी सुरू केले होते... पण शिक्षक आणि शिक्षण व्यवस्था या कॉपीच्या प्रकारांना पुरून उरलीय. त्यामुळे कॉपी करणारे तर पकडले जातीलच पण आता या मुन्नाभाईंवर पण कारवाई होणार आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा होत आहेत. पण य़ा ऑनलाईन परीक्षेत कॉपी कशी करायची, याचे धडे देणारे काही व्हिडीओ नागपूरमध्ये व्हायरल झालेत.
या मुन्नाभाईंचे सल्ले घेऊन कॉपी केली तर ते महागात पडेल, असा इशारा विद्यापीठानं दिलाय. तसंच या व्हिडीओप्रकरणी तक्रारही करण्यात आली आहे.
ऑनलाईन परीक्षेदरम्यान परीक्षार्थीनं कॅमेरा बंद ठेवणे, माईक म्यूट करणे, स्क्रिन बंद करणे, स्क्रीन समोरून उठून जाणे, कुणाशी बोलणे असे प्रकार करून कॉपी करण्याचा प्रयत्न केला, तर या सगळ्या गोष्टीची परीक्षा विभागाकडे त्वरित ऑनलाईन नोंद होते. आणि विद्यार्थ्याने एका पेपरमध्ये पाच वेळेला असं कृत्य केलं तर ऑनलाईन सिस्टम त्याचे पेपर लॉक करते.....त्यामुळे अभ्यास करा, परीक्षा द्या....मुन्नाभाई बनू नका....